मंगळवार, ३१ जानेवारी, २०१७

सोलापुरातील बेंद्रेपर्व !

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, कन्नड महाकवी द. रा. बेंद्रे यांची आज जयंती. सोलापुरात त्यांचं अनेक वर्षं वास्तव्य होतं. कवितेबद्दल झालेला कारावास भोगून आल्यानंतर सोलापुरातील दयानंद महाविद्यालयात ते कन्नड विषयाचे प्राध्यापक होते. विद्वानांच्या सभेपासून दारी येणाऱ्या याचकापर्यंत सगळ्यांशी सारख्याच ममत्वानं बोलणाऱ्या या महाकवीची आठवण जागवणारा लेख.
000000000000000000
रजनीश जोशी, सोलापूर
0000000000000000000



महाकवी द. रा. बेन्द्रे म्हणजे साक्षात्कारी पुरूष. साक्षात्कारी अशा अर्थानं की तुम्ही कोण आहात, त्याचा साक्षात्कार तुम्हालाच देतील.
एकदा झालं असं, की काही चित्रकार बेन्द्र्यांकडं गेले. त्यांनी सांगितलं, "आम्ही काही चित्रकार आमच्या चित्रांचं एक प्रदर्शन भरवावं म्हणतो. तुम्ही त्याचं उद्घाटन करावं, आम्हाला मार्गदर्शन करावं, अशी आमची विनंती आहे."
बेन्द्र्यांनी त्यांचा उत्साह जाणला. त्यांनी या चित्रकारांना विचारलं, "किती चित्रकारांची चित्रं प्रदर्शनात ठेवणार आहात?"
बेन्द्र्यांच्या या प्रश्नानं त्यांना हुरूप आला. त्यांनी उत्तर दिलं, "साधारणपणे 80 ते 85 चित्रकार असतील. त्यांची चित्रं असतील."
मग बेन्द्र्यांनी त्यांना विचारलं, "तुम्ही तुमच्या या सोलापूर शहराचं आकाशातून, उंचावरून दर्शन घेतलं आहे का... मी स्वतः अनेकदा वारदबंगल्यावरून किंवा हरिभाई देवकरण प्रशालेच्या गच्चीवरून हे शहर पाहिलं आहे. एरवी नुसतं रूक्ष वाटणारं हे शहर उंचावरून पाहताना हिरवंगार दिसतं. तुम्ही ते पाहिलंय का? या शहरातले तलाव असे न्याहाळले आहेत का...?"
त्यावर चित्रकारांना काही बोलता आलं नाही. ते सारे गप्प झाले. कारण नेहमीच्या पठडीतल्या चित्रांशिवाय त्यांनी वेगळी चित्रे काढायचा प्रयत्न केला नव्हता. त्यामुळं ते निरूत्तर झाले.
बेन्द्रे पुढं म्हणाले,"तुम्ही 80-85 चित्रकारांनी तुमच्या चित्रांचं प्रदर्शन भरवण्याआधी स्वतःचंच प्रदर्शन भरवावं."
त्यांच्या या म्हणण्याचा अर्थ चित्रकारांना उमगला नाही. त्यांनी "म्हणजे काय," असं विचारलं.
बेन्द्रे म्हणाले, "तुमच्यापैकी प्रत्येकानं दुसऱ्याचं चित्र काढायचं. म्हणजे तुम्ही सगळे एकमेकांसमोर बसून एकमेकांची चित्रं काढा."
"पण त्यामुळं काय होईल?", असं चित्रकारांनी विचारलं.
तेव्हा बेन्द्रे म्हणाले, "त्यामुळं गावातले कलावंत नेसतात काय, दिसतात कसे, खातात काय, कसल्या घरात राहतात, कुठे बसतात, उठतात. कशात वेळ घालवतात या गोष्टींचं आपोआप चित्रण होईल. त्या ८० तसबिरींचं प्रदर्शन लोकांपुढं करा. म्हणजे नागरिकांना आपोआप कलावंतांचं जीवन आणि त्यांची कला कळून येईल. तुमचं प्रदर्शन पाहून नागरिकांना कलावंतांच्या जिण्याची, परिस्थितीची खंत वाटली तर प्रदर्शन यशस्वी झालं, असं म्हणता येईल!"
एका चित्रकारानं बेन्द्र्यांना म्हटलं,"कल्पना चांगली आहे. पण एक अडचण आहे..."
"काय अडचण आहे?" बेन्द्रे म्हणाले, "हे प्रदर्शन कुठं लावायचं हीच ना? कुठंच जागा नाही मिळाली तर माझ्या पुस्तकाच्या खोलीत आठ दिवस लावेन ही चित्रं."
"तसं नाही," तो चित्रकार म्हणाला,"चित्रकारांमध्ये एवढं सख्य कुठून असायला. एकमेकांची चित्रे काढण्याइतका मैत्रभाव त्यांच्यात नाही."
"असं म्हणता..." बेन्द्रे म्हणाले, "एका जातीचे कलावंत म्हणवता आणि तुमच्यात सहानुभूतीचा, सख्याचा धागा नसेल तर कोण्या तिऱ्हाईत प्रेक्षकांना तुमच्या जीवनाची, कलेची कदर काय म्हणून असावी? विचार करा..."
केवळ या चित्रकारांनाच नाही तर तमाम कलावंतांना उद्देशूनच त्यांचे हे विधान होते. आजही ते अनेक क्षेत्रात लागू होते.
बेन्द्रे द्रष्टे होते, याची अनेक उदाहरणं सांगता येतील, पण त्यातलं चित्रकारांचं उदाहरण बोलकं मानावं लागेल. त्यांचं सांगणं परखड असलं तरी त्यामागचा भाव सच्चा असे. त्यामुळं आपले दोष दाखवले तरी संबंधितांना त्याचं वैषम्य वाटत नसे. त्यांचं अंतःकरण मित्रत्व आणि करूणेनं ओथंबलेलं असे. कॉलेजातील एखाद्या विद्यार्थ्याशी ते जितक्या सलगीनं वागतील तितक्याच सलगीनं एखाद्या सरकारी माणसाशी बोलतील. विद्यार्थ्यांना समजावून सांगणं, सांगितलेलं त्यांना समजलं आहे की नाही याची खातरजमा करून घेणं हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यासाठी ते कितीही परिश्रम घेत. शिकवण्यासाठी कॉलेजचा वर्गच लागे असं नाही. अगदी एखाद्या झाडाखाली, रस्त्याच्या कडेला उभं राहूनही ते काही सांगत असत. शिकवत असत. त्यांच्यातील कुतूहल बालसुलभ असे. दारावर येणाऱ्या कोणत्याही भिकाऱ्याला ते विन्मुख पाठवत नसत. त्यात अगदी वैदू, फासेपारधी किंवा आणखी कुणी आले तरी त्याच्याशी सलगीचं बोलून त्याला काही देत असत. एकदा त्यांच्या दारापुढं दरवेशी आला होता. त्याला घरात अंगणात बोलून त्याच्याशी खाली बसून ते गप्पा मारू लागले, त्याची सुखदुःखं जाणून घेऊ लागले. असं अनेकांना आत्मसात करण्याचं त्यांचं कसब खास त्यांचंच होतं.
बेन्द्र्यांनी मराठीतूनही लेखन केलं आहे. १९६५ साली दा. गो. देशपांडे यांनी त्यांचे ३३ मराठी गद्य लेख आणि ४४ मराठी कविता एकत्र करून त्याचा "संवाद" हा संग्रह प्रसिद्ध केला आहे. बेन्द्रे यांच्या प्रतिभेचा फुलोरा जेव्हा बहरला तेव्हा त्याचा सुगंध कन्नड भाषेच्या मंदिरात दरवळला. आणि जेव्हा त्यांच्या प्रतिभेस परिपक्व फळं लागली तेव्हा ज्ञानेशांच्या अमृतसिंचनानं पावन झालेल्या मराठीच्या भूमीवर ही फळे पडू लागली. बेन्द्र्यांच्या प्रतिभेत उजळलेल्या जीवनदर्शनाचे सार आगळ्या तेजानं मराठीला लाभले, अशा शब्दात दा. गो. देशपांडे यांनी त्यांच्या मराठी लेखनाबाबत लिहून ठेवलं आहे. १९४७ पासून १९८० पर्यंत त्यांनी मुंबई, पुणे, नागपूर, अक्कलकोट, सोलापूर, औरंगाबाद, जळगाव, अंमळनेर, अमरावती, कारंजा, अंबेजोगाई, इंदूर, ग्वाल्हेर या ठिकाणी मराठी व्याख्याने दिली. सोलापूर आणि पुण्यात त्यांची सर्वाधिक व्याख्याने झाली. त्यामुळं त्यांच्यातील साहित्यिक कर्तृत्वाबरोबरच ते उत्तम वक्ते असल्याचं अनेकांना ठाऊक झालं. दैवी संपत्ती प्राप्त करून घेण्याचा एक कलात्मक कर्मयोग या दृष्टीने बेन्द्रे साहित्याकडं पाहतात, असं त्यांच्या लेखनाबद्दल म्हटलं जातं.
बेन्द्र्यांना अनेक विषयात रूची होती, गती होती आणि जाण होती. ज्योतिष, भविष्य, गणित, उपनिषदे, वेद, सांख्यिकी, शिल्पकला, वास्तुकला, रसायनशास्त्र, गूढविद्या, चित्रकला, आकृत्या, कोष्टके एक ना दोन, सगळ्यात त्यांना रस होता.
बेन्द्र्यांना अनेक विषयांमध्ये गती असल्यानं त्यांच्या कवितेत त्याचं प्रतिबिंब पडलेलं नसेल तरच नवल. त्यांच्या कवितेत नाद आहे, लय आहे.
या भ्रमातुनी, हर श्रमातुनी, मम तमातुनी,
जे चमके, त्या छंदा, नवीन गमके ।
भू-भवातुनी । अनु-भवातुनी । नवनवातुनी ।
जे विलसे । कधि गवसे । कधी न गवसे ।
तनु-धनातुनी । जन-मनातुनी । घन-घनातुनी ।
जे गमते । ते भ्रमते । कधी कधी जमते ।
शैशवात ही । मा-धवात ही । त्या शिवात ही ।
जे नटले । त्या भवास । अंकुर फुटले ।
कवीच्या अनुभवाचा, त्याच्या स्फूरणाची ही माहिती आहे. त्याच्या प्रतिभेला नवांकुर कसे फुटतात, त्याचं हे वर्णन निर्मिती प्रक्रियेसंबंधी गूज करणारं आहे. अनुप्रासाची रचना आणि आशयाची पक्वता दर्शवणारं त्यांचं हे काव्य आहे.
त्यांच्या काव्यसंग्रहांची नावं पाहिली तरी त्यांचा वैविध्यपूर्ण रचनाविशेष ध्यानात येतो. 'कृष्णकुमारी', 'गरी' (म्हणजे पीस), 'मूर्ती मत्तू कामक सुत्री', 'सखीगीता', 'उय्याले', 'नादलीले', 'मेघदूत', 'हाडू पाडू', 'गंगावतरण', 'सूर्यपान', 'हृदयसमुद्र', 'मुक्तकांता', 'चैत्यालय', 'जीवलहरी', 'अरळू मरळू', 'नमन', 'संचय', 'उत्तरायण', 'मुगिलमालिगे', 'यक्ष यक्षी', 'नाकु तंती', 'मर्यादे', 'श्रीमंत', 'बा हत्तरा', 'इदू नभोवाणी', 'विनय मत्ते श्रवणबेत्तू', 'ओलावे नम्म बडकू', 'चतुरोक्ती', 'पाराकी', 'काव्यवैखरी', 'बोलबोधे', 'ता लेख्खनकी ता दौती', 'चैतन्यदा पूजे', 'प्रतिबिंबगळू, श्रवणप्रतिके', 'कुनियोनुबा', 'बुद्धा' हे त्यांचे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. 'तिरूकारा पिडुगु', 'उद्धारा', 'नागेया होगे', 'हुय्यतगळू', 'होसा संसारा मत्तु इतरा एकांकगळु', 'अंबिकातनयदत्त नाटक संपुट' ही नाटके प्रसिद्ध आहेत. तर 'निर्भरन सुंदरी' हा कथा संग्रह आहे. त्यांनी अनेक कविता आणि साहित्यप्रकारावर टीका लिहिली आहे. त्याचे नऊ समीक्षाग्रंथ आहेत. त्यात संतसाहित्याचाही समावेश करता येईल. 'विठ्ठलसंप्रदाय', 'थिएरी ऑफ इमॉटिलिटी', 'संवाद', 'श्रीअरविंद योग', 'कबीर वचनावली' हे त्यांचे अन्य भाषांमधील ग्रंथ होत. त्यांनी गुरूवर्य रानडेंच्या ग्रंथाबरोबरच रवीन्द्रनाथ टागोर, कवी अनिल यांच्या साहित्याचाही अनुवाद केला आहे. त्यांच्या 'अरळू मरळू' म्हणजे 'साठी बुद्धी नाठी' या काव्यसंग्रहाला १९५८ साली साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. तर 'नाकु तंती' या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला.

त्यांची तन्मयता हा चर्चेचा स्वतंत्र विषय आहे. त्यांचे विद्यार्थी आणि दीर्घकाळचे स्नेही प्रा. वसंतराव दिवाणजी यांच्यासमवेत घडलेला एक किस्सा गमतीशीर आहे, पण त्यांच्या तन्मयतेचं उदाहरणही आहे. वसंतराव दिवाणजी आणि बेंद्रे यांची रोजच भेट होत असे. सोलापूरहून विजापूरकडं जाणारी मीटरगेज रेल्वे तेव्हा होती. बेंद्रे वसंतरावांना म्हणाले, "उद्या वेळ आहे का? आपल्याला जरा परगावी जायचंय.' महाकवीबरोबर प्रवास करणं यासारखी आनंदाची गोष्ट ती कोणती? वसंतरावांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणं वसंतराव रेल्वे स्टेशनवर पोचले. रेल्वे आली, दोघे त्यात बसले आणि प्रवास सुरू झाला. बेंद्रे यांचा लौकिक सोलापुरातच नव्हे तर आजूबाजूच्या विजापूर, गुलबर्गा अशा अनेक गावांत पसरलेला हे वेगळं सांगायला नको. दोघांचं बोलणं सुरू झालं. म्हणजे बोलत बेंद्रेच होते, वसंतराव ऐकत होते, मधूनच प्रश्‍न विचारत होते. रेल्वे डब्यातील बाकावर बसून बोलताना दोघांनाही अवघडल्यासारखं वाटलं. मग ते चक्क खाली मांडी ठोकून बसले आणि चर्चा रंगली. विशेष म्हणजे, बेंद्रेंची वाणी ऐकण्यासाठी आजूबाजूच्या कंपार्टमेंटमधले प्रवासीही जवळ येऊन उभे राहिले. त्यांचं आयतंच प्रबोधन होत होतं. काही वेळानं टीसी आला. त्यानं बेंद्रेंकडं तिकिट मागितलं. बेंद्रे वसंतरावांना म्हणाले,"तिकिट दाखव यांना.' वसंतराव चपापले, म्हणाले,"माझ्याकडं कुठंय, तुम्हीच काढलंय ना.' बेंद्रे ठामपणे म्हणाले,"हो, मी दोघांचंही तिकिट काढलंय, पण ते तुझ्याकडं दिलंय.' वसंतरावांना पक्कं आठवत होतं, तिकिट त्यांच्याकडं नव्हतं. तरीही त्यांनी स्वतःचे खिसे चाचपले आणि बेंद्रयांना सांगितलं, "नाही, माझ्याकडं नाही.' मग बेंद्रे आपले खिसे चाचपू लागले. बरोबरची पिशवी उलटी करून तीत शोध घेतला. पण तिकिट काही सापडले नाही. टीसी हे सगळं पाहत होता. तो बेंद्रेंना ओळखत होता. म्हणाला,"असू दे. गडबडीत कुठं तरी पडलं असेल.' बेंद्रे म्हणाले," तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. पण तिकिट नाही सापडलं तर मला कुठं जायचंय हेच कळणार नाही. कारण कुठं उतरायचं तेच माझ्या लक्षात नाही.' वास्तविक हा विनोद. पण वसंतराव आणि बेंद्रे यांच्यातील चर्चा कशी आणि किती रंगली असेल त्याचं प्रत्यंतर देणारा. बेंद्रे यांच्या अशा अनेक कथा सोलापुरातील जाणकारांमध्ये आजही चर्चिल्या जातात. या शहराला एका महाकवीचं सानिध्य लाभलेलं होतं आणि त्यानं हा परिसर समृद्ध करून टाकला होता, ही अविस्मरणीय गोष्ट आहे.
रजनीश जोशी
मोबाईल - 9850064066