गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

मौनं सर्वार्थ साधनम्

 

मौनं सर्वार्थ साधनम् !



परवा रस्त्यानं जाताना कोपऱ्यातल्या चहाच्या टपरीवर पाच-सहा तरूण तावातावाने हातवारे करून भांडत असल्याचे दृश्य लांबून दिसले. मी जवळ पोचलो, तेव्हा ते सगळे मुके होते आणि खाणाखुणांच्या भाषेत मुक्यानेच बोलत होते, असे लक्षात आले. त्यांची ती मौनाची भाषा परस्परांना समजत होती. लांबून पाहणाऱ्याला मात्र त्यांच्यात संघर्ष चालल्यासारखं भासत होतं!

मौन बोलतं करतं तेव्हा ते अर्थपूर्ण असतंच, पण बऱ्याचदा अबोलणंही खूप काही सांगणारं असतं. खूपदा, अंतःकरण भरून आलेलं असतं, पण मुखावाटे एक शब्दही फुटत नाही. तरीही संवाद होत असतो. 'ये हृदयीचे ते हदयी' सगळं पोचत असते. असा मौनसंवाद असतो खूप दिवसांनी भेटलेल्या जिवलगांचा! आभाळ भरून आलेलं असतानाही ढग काही फुटत नाही, तशातला प्रकार!

मौन असं कुठं कुठं 'संवादत' असतं. नाटकातलं दोन वाक्यातलं मौन खूप काही बोलणारं असतं. कित्येकदा न बोलताही अपेक्षित परिणाम साधून जातं. कितीतरी दिवसांनंतर भेटल्यानंतरही फक्त 'हं ! हं !' इतकीच प्रतिक्रिया देणाऱ्या 'त्याला' ती म्हणते,''झालास पारवा? लागलास घुमायला!'' विजय तेंडुलकरांच्या 'मादी'मधला हा संवाद आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक अर्थसन्मुख करणारा हा 'पॉज', हे क्षणकालाचं मौन अर्थगामी असतं. म्हणून अनेक उत्तम अभिनेते किंवा अभिनेत्री वाचाळ बडबडीपेक्षा मौनानं अधिक संवादतात!

योगसाधनेत मौन राहणं किंवा मौन पाळणं अत्याधिक महत्त्वाचं असतं. इगतपुरीच्या श्री. गोयंकागुरुजींच्या आश्रमात जितक्या दिवसांचा कोर्स असतो, तितके सगळे दिवस मौन पाळण्याचाच संकेत असतो. कोणताही साधक शक्यतो एकमेकांशी बोलून संवाद साधत नाही. आपल्या मनाची द्विधा अवस्था किंवा विचारांचा कल्लोळ हळूहळू शांत करीत माणसानं सर्वार्थानं निवांत व्हावं, यासाठीची ही मौनसाधना असते. मनाची मागणीच कमी होण्यासाठी ही तपस्या करावी लागते. आपले स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी मौनासारखे दुसरे साधन नाही.

रुसव्या-फुगव्यातलं मौन, तो अबोला अगदी कासावीस करून टाकतो दोघांना, पण काही काळ ओसरला की या मौनानंच त्यांना बोलकं केलेलं असतं. कवी हेमकिरण पत्कींच्या कवितेत हे मौनसंभाषण अल्पशब्दांतून प्रत्ययाला येतं. प्रेमामध्ये अशा अपघातानं उमटणाऱ्या मौनाला चांगला अर्थ असतो. तो अबोला, ते जाणते मौन अजिबात गौण नसतं, त्यातून नात्याला छान दिशा मिळते.

राजकीय मौन ही तर अर्थगर्भ खेळीच असते. कोणत्यावेळी बोलायचं आणि कोणत्यावेळी गप्प राहायचं हे मुरब्बी राजकारण्याला चांगलंच समजलेलं असतं. राजकारण्याच्या मौनाला अर्थाच्या अनेक छटा असतात, पण कोणता राजकारणी मौन पाळतो, त्याला फार महत्त्व आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या संसदेत मौन राहण्याच्या कृतीवर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं होतं ते मौनातूनच!

एखाद्या अनुपम सौंदर्यानं आपण स्तीमित होतो, आपले शब्द विरून जातात. कन्याकुमारीच्या तीन समुद्रांच्या संगमातला सूर्यास्त पाहताना किंवा कोणार्कपासून तीन किलोमीटरवर असलेल्या समुद्रातून सूर्यबिंब हळूहळू वर येताना सूर्योदयाचं दृश्य पाहताना कितीतरी वेळ मी मूकस्तंभ झालो होतो..!


रजनीश जोशी

०००

प्रतिभावान वाघचवरे बंधू





प्रतिभावान वाघचवरे बंधू 


 'फोरेन्सिक ओडोन्टोलॉजी' या फारशा ज्ञात नसलेल्या विषयाचा अभ्यास असलेले डॉ. सत्यजित वाघचवरे आणि चंदिगढमध्ये 'टफमॅन' ठरलेले डॉ. अभिजित हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे त्यांचे बंधू ही अक्षरशः अफलातून प्रतिभा असलेली व्यक्तिमत्वे आहेत.

गड-किल्ल्यांवरची चढाई असो किंवा मॅरेथॉनसाठी धावणं; सोलापूरातील डॉ. सत्यजित आणि डॉ. अभिजित वाघचवरे यांचा त्यात उत्साहवर्धक सहभाग असतो. सोलापूरात 'सायक्लोथॉन' रुजवणारे हे दोघे डॉक्टरबंधू आपापल्या क्षेत्रात नामवंत आहेत. बोलता बोलता दंतरुग्णाच्या वेदना कमी करणारे दंतवैद्य डॉ. सत्यजित हे आगळे व्यक्तिमत्व आहे. तर अस्थिरोग तज्ज्ञ म्हणून लौकिक असलेल्या डॉ. अभिजित यांनी मॅरेथॉनच्या माध्यमातून आपल्या नावाचा डंका सातासमुद्रापार पोचवला आहे. अलीकडेच त्यांनी चंदिगढ येथील 'टफमॅन' स्पर्धेत महाराष्ट्रात प्रथम आणि राष्ट्रीय स्तरावर पाचवे स्थान मिळवून आपला लौकिक वाढवला आहे.

डॉ. सत्यजित वाघचवरे 'डेंटिस्ट' म्हणून केवळ उपचारच करतात असे नाही, तर त्यांनी दातासंबंधी विशेष संशोधन केले आहे. त्याबाबत लेखनही केलं आहे. आपल्या देशात बऱ्याचदा भीषण अपघात होतात. त्यावेळी मृतदेहांची ओळख पटवणे ही मोठी जिकिरीची आणि भावनिक गोष्ट झालेली असते. डीएनए किंवा अन्य चाचण्या घेणेही कठीण असते, तेव्हा नेमकं काय करावं याविषयी ते सांगतात, ''दात ही व्यक्तीची खरी ओळख असते. ज्यावेळी डीएनए चाचणी घेणे शक्य नसते तेव्हा दाताची ठेवण, दातांचे अवशेष सबळ पुरावा म्हणून विचारात घेता येऊ शकतात. दातांवरून, दातांच्या रचनेवरून, दातांच्या फोटोग्राफ-एक्स-रे वरून, दातांवर केलेल्या इलाजांवरून एखाद्या व्यक्तीची ओळख पटवून देता येते. कारण दात हा शरीरातील सर्वात टणक अवयव आहे. त्याचे विघटन होणे तसे खूप अवघड असते. आपण वाचले ऐकले किंवा पाहिलेही असेल इजिप्तमधल्या ‌‌'ममी‌‌'चे दात आजही आहेत्याच स्वरूपात शाबूत आहेत. याचाच अर्थ दात कित्येक वर्षे न कुजता राहू शकतो. म्हणूनच दातांची रचना ही एखाद्या व्यक्तीची ओळख असते.''

फोरेन्सिक ओडोन्टोलॉजी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा डॉ. सत्यजित यांनी अभ्यासला आहे आणि त्याबाबत सर्वसामान्यांना समजेल अशा भाषेत लेखन केले आहे. झोपेतून उठल्यानंतर मुखमार्जनाची आवश्यकता का असते इथेपासून ते दात कसे स्वच्छ करायचे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले आहे. बरेच लोक ब्रशने दात घासताना फरशी घासल्याप्रमाणे जोर लावतात, परिणामी त्यांचे दात झिजतात, वाकडे होतात आणि पुढच्या काळात त्यांना त्रास होऊ शकतो, याविषयी डॉ. सत्यजित आपल्या रुग्णांशी करीत असलेला संवाद अक्षरशः श्रवणीय असतो.

सतत सात तास वीस मिनिटे वेगवेगळ्या प्रकाराने स्वतःच्या शरीराला कष्ट देणं ही सामान्य गोष्ट नाही. सुरूवातीला १.९ किलोमीटरचे स्वीमिंग, त्यानंतर ९० किलोमीटरचे सायकलिंग आणि त्यानंतर लगेच २१ किलोमीटर धावणे ही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे. त्यासाठी शरीर आणि मन, प्रबळ असणं गरजेचं असतं. त्यासाठी सहा महिने सतत कठोर परिश्रम, रोजचा सराव आणि त्यानुसार आहार ही खरं तर एक तपश्चर्याच म्हणावी लागेल. आंतरराष्ट्रीय दर्जा काय असतो, त्याचा प्रत्यय डॉ. अभिजित यांनी दाखवून दिला आहे. यापूर्वी आयर्न मॅनचा किताब त्यांनी संपादन केला आहे, याखेरीज दक्षिण आफ्रिकेतील ९० किलोमीटर धावण्याची 'कॉमरेड्स मॅरेथॉन' त्यांनी पूर्ण केली आहे. चंदिगढच्या विजयामुळे ते आता 'टफमॅन' ठरले आहेत. त्यांना त्यांचे बंधू डॉ. सत्यजित यांच्याप्रमाणेच डॉ. राजश्री आणि डॉ. शुभांगी वाघचवरे यांचेही पूर्ण सहकार्य मिळते. संपूर्ण वाघचवरे कुटुंबच समाजसेवेच्या ध्यास घेतलेले आहे. शेती, वैद्यकीय व्यवसाय, मॅरेथॉनसारख्या स्पर्धांचे आयोजन, तरुणांकडून त्यासाठी तयारी करून घेणे, देशविदेशात ट्रेकिंग आणि तत्सम कारणासाठी दौरे अशा नानाविध उपक्रमात हे सारे कुटुंब रंगून गेले आहे.

०००





रविवार, २४ जून, २०१८







लेखनाची आवड असणारी व्हिक्टोरिया राणी !



व्हिक्टोरिया राणीच्या नावानं मुंबईतलं व्हीटी स्टेशन ओळखलं जात असे, तिला आपल्या आयुष्यातील छोट्या मोठ्या घटना लिहून ठेवण्याची सवय होती. तिला पत्रलेखनाचीही हौस होती. संबंधितांना ती मोठाली पत्रे लिहित असे. तिच्या लेखनाच्या आवडीमुळे तिच्या आयुष्यातील अनेक घटना-प्रसंग सर्वसामान्यांना ठाऊक झाले. प्रिन्स अलबर्टच्या संगतीनं स्कॉटलंडमध्ये घालवलेले दिवस हे आपल्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचे आणि सुखाचे दिवस होते, असं तिनं लिहून ठेवलंय. विशेष म्हणजे, या कालखंडात आणि पुढंही जेव्हा केव्हा एखादी समाधानकारक घटना घडत असे, तेव्हा ती लगेच आपल्या नोंदवहीत ती तपशीलवार लिहून ठेवत असे. आयुष्यातील सुखाच्या इतक्या 'सिरियस नोट्स' क्वचितच कुणी काढल्या असतील. 'लिव्हज फ्रॉम द जर्नल ऑफ आवर लाईफ इन द हायलँड्स'मध्ये तिच्या आठवणी सापडतात. स्कॉटलंडमध्ये हायलँड्स आणि लोलँड्स असे भाग आहेत. हायलँड्सला ऐतिहासिक महत्त्व आहे. हायलँड आणि लोलँडच्या भाषेतही फरक आहे. एकेकाळी तिथं मोठी लोकवस्ती होती, आता ती विरळ झाली आहे. निसर्गसुंदर हायलँडमधील वास्तव्य व्हिक्टोरियाला सुखावह वाटले नाही तरच नवल. प्रिन्स एडवर्डची ही कन्या अनेक अर्थाने भाग्यवान होती. दुर्दैवाने, तिचे तीनही भाऊ अकाली वारल्यामुळं ब्रिटिश साम्राज्ञीपद तिच्याकडं चालून आलं. ब्रिटिशांनी भारतावर कबजा केल्यानं ती भारताचीही साम्राज्ञी ठरली. तिच्या प्रभूत्वाचा कालखंड 63 वर्षांचा होता.
भारतातही जुन्या काळात अनेक महिलांनी आत्मचरित्र लिहून ठेवलं आहे. लक्ष्मीबाई टिळक (स्मृतीचित्रे), रमाबाई रानडे (आयुष्यातील आठवणी), लीलाताई पटवर्धन (आमची अकरा वर्षे), कमलाबाई देशपांडे (स्मरणसाखळी), पार्वतीबाई आठवले (माझी कहाणी), आनंदीबाई कर्वे (माझे पुराण) यांसह इतरही काहींचा त्यात समावेश करता येईल.
काही आत्मचरित्रांची वैशिष्ट्यं नमुनेदार आहेत. साहित्याचे नोबेल पारितोषिक पटकावलेल्या कार्ल स्पिटलर या स्वीस कवीनं लिहिलेलं आत्मचरित्र त्याच्या वयाच्या चौथ्या वर्षापर्यंतचीच हकीकत सांगते. स्पिटलरनं आशावादी आणि प्रेरणादायी कविता लिहिल्या. माणसाला साधारण चौथ्यावर्षानंतरच्या आठवणी तीव्रतेने स्मरतात. दात आणि पाय फुटल्यानंतरच्या घटना साधारणपणे लक्षात राहतात, असं मानलं जातं. पण स्पिटलरचं आत्मचरित्र फक्त चौथ्या वर्षापर्यंतचंच आहे.
आणखी एक गमतीदार आत्मचरित्र आहे जेम्स जॉयस या आयरिश कवी, कथाकार आणि कादंबरीकाराचं. त्याने तर बारा तासाच्या अवधीत त्यांच्या मनात जे विचार उमटले तेच टिपून ठेवले आहेत, त्याची आठशे पानं भरली. डब्लिन हे त्याचं अत्यंत आवडतं शहर होतं आणि त्याच्या लेखनात त्याचा वारंवार उल्लेख व संदर्भ येतो.


शनिवार, २३ जून, २०१८



पुनमचंद बिश्‍नोई


सलमान खानने गोळ्या घालून मारलेल्या काळविटामध्ये पुनमचंद बिश्‍नोईंनाच नव्हे; तर तमाम बिश्‍नोई समाजालाच त्यांचे गुरू जांभेश्‍वर यांचे प्रतिरूप दिसले. कारण 1451 साली बिश्‍नोई पंथाची स्थापना करणाऱ्या या गुरूंनी देह ठेवताना आपल्या शिष्यवर्गाला सांगितले होते, ""मी पुन्हा जन्माला येईन तो काळवीट होऊन.'' पुनमचंद या जोधपूरजवळच्या कंकानी गावात राहणाऱ्या बिश्‍नोईला ही गोष्ट जन्मजात ठाऊक होतीच. साहजिकच, 1998 साली सलमानने आपल्या सहकारी कलावंतांसमवेत केलेल्या काळविटाच्या शिकारीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा होण्यासाठी पुनमचंद आणि संपूर्ण बिश्‍नोई समाजाने कंबर कसली. परिणामी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली.
पुनमचंद त्यामुळे आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. "प्राणीमात्रावर दया करा',"वृक्षतोड करू नका' हा संदेश पंधराव्या शतकात गुरू जांभेश्‍वरांनी देऊन ठेवला आहे. पुनमचंदांनी सलमानच्या "दबंग'गिरीला न घाबरता शेवटपर्यंत लढा दिला. त्यांच्यापुढे आदर्श होता तो त्यांच्या समाजातील अमृतादेवी आणि आशू, रत्नी व भागू या तीन मुलींचा. शतकभरापूर्वी, जोधपूरच्या राजाने महाल बांधण्यासाठी खेजरी झाडं तोडायचा आदेश दिला. तेव्हा या झाडांना मिठी घालून या चौघी घट्ट उभ्या राहिल्या. त्यात त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. पण त्या जागच्या हलल्या नाहीत. नंतरच्या काळात सुंदरलाल बहुगुणांच्या "चिपको आंदोलना'ची हीच प्रेरणा होती. अशा धीरोदात्त, शूर बिश्‍नोई महिलांचा वारसा पुनमचंद सांगतात. हरिणाचे एखादे पाडस आईविना अनाथ झाले असेल तर आपल्या बाळाबरोबर त्या पाडसाला स्तनपान करणाऱ्या महिला आजही तिथे आढळतात. मग, पुनमचंदांनी शिकारी सलमानच्या जिप्सीचा पाठलाग करून गाडीनंबर लिहून वनखात्याकडे सोपवला यात नवल ते काय ! बिश्‍नोई टायगर फोर्स, .भा.जीवरक्षा बिश्‍नोई सभा आणि बिश्‍नोई वन्यजीव पर्यावरण संस्थान या संघटनांनी आजवर 400 शिकारी पकडून दिले आहेत. जैवविविधता आणि प्राणीमात्राच्या रक्षणासाठी प्राणार्पणाची तयारी ठेवलेल्या पुनमचंदांनी पुढच्या काळातही असे प्रकार होऊ नयेत, यासाठी डोळ्यात तेल घालून राखण करण्याचा विडा उचलला आहे. खरे पाहिले तर ही केवळ बिश्‍नोईंचीच नव्हे तर आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, नाही का?




मोबाईल झाला गुरू !

कुगावच्या संतोषने मोबाईलद्वारे केला
पोलिस उपनिरीक्षक परीक्षेचा अभ्यास


मोबाईलचा शोध लागला आणि सर्वांना आनंदच झाला. मग, त्यात सुधारणा झाल्या, स्मार्ट फोन आला. त्यातही अनेक सुविधा उपलब्ध झाल्या. तथापि, कॅमेरा, व्हिडिओ शुटिंग, फोटोशॉपचा वापर करून फेसबुक, वॉटसअॅपवरून बदनामीचे प्रकार प्रामुख्याने केले जाऊ लागले. मात्र सोलापूर जिल्ह्यातल्या करमाळा तालुक्यातील कुगावच्या संतोष कामटे या तरूणाने मोबाईलचा वापर करून आपल्या आयुष्याला सुंदर वळण दिले. नुकत्याच झालेल्या पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास संतोषने चक्क मोबाईलवर केला. यासंदर्भात बोलताना संतोष कामटे म्हणाला, "कुठेही ट्युशन किंवा स्पेशल क्लास लावण्याइतके पैसे माझ्याकडं नव्हते. मात्र मोबाईलवर टेलिग्राम नावाचे चॅनल आहे. त्यावरून एमपीएसस्सीचा अभ्यास करता आला. "
टेलिग्रामवरील पीडीएफ फाईलच्या सुविधेमुळे अभ्यासासाठी पुस्तके मोफत उपलब्ध झाली. रोज किमान दहा तास अभ्यास केल्याचं संतोषनं सांगितलं. संतोषचे वडील सालकरी गडी आहेत. त्यामुळं त्यांचं आर्थिक उत्पन्न बेताचं आहे. कुटुंबाचा चरितार्थ कसाबसा भागवला जात असताना संतोषच्या अभ्यासासाठी पुस्तकांचा खर्च त्यांना झेपणं शक्य नव्हतं. मात्र संतोष डगमगला नाही. मित्रांच्या मदतीनं त्यानं पोलिस उपनिरीक्षक पदाचा अभ्यास केला. केवळ पुस्तकी अभ्यास करूनही भागणार नव्हतं. म्हणून संतोषनं शारीरिक क्षमताही सुधारली. त्यासाठीही पुन्हा मित्रच कामाला आले. आणि आता पोलिस उपनिरीक्षक बनण्याचं त्याचं स्वप्न साकार झालं आहे.
"कठीण समयी मोबाईल कामास येतो" अशी नवी म्हण संतोषच्या ध्यासानं कॉईन झाली आहे. तरूणांनी मनात आणलं तर मोबाईल शत्रू न वाटता आयुष्याला चांगलं वळण देणारा उत्तम मित्र बनू शकतो, हे सिद्ध झालं आहे.

- रजनीश जोशी

बुधवार, ३० मे, २०१८


नळदूर्गच्या "आपलं घर'ने दिला अनाथांना आधार !

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदूर्गजवळ असलेल्या "आपलं घर' संस्थेची उभारणी केली आहे राष्ट्र सेवा दलाने. 1993 साली किल्लारी आणि परिसरात भूकंप झाला. त्यात हजारो लोक मरण पावले. घरादाराची राख रांगोळी झाली. माणसं जीवानिशी गेली, मागं उरलेल्यांचं काय? "जगाला प्रेम अर्पावे' या प्रेमभावनेशी कटिबद्ध होऊन राष्ट्रसेवा दलाने त्यांच्यासाठी प्रेमाचा हात पुढे केला. जे या आपत्तीत निवर्तले त्यांच्या अपत्यांना जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी सुरू झालेल्या नळदूर्गच्या "आपलं घर'मधील लक्ष्मी आज अमेरिकेत आहे तर छाया माने ऑस्ट्रेलियात. या दोघींचे आई-वडील भूकंपात नाहिसे झाले. शामल पोतदार या मुलीचे आईवडीलही भूकंपात गेले, पण माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी तिला शिक्षणासाठी दत्तक घेतले आणि ती पदवीधर होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली.

आईवडिलांपासून निराधार झालेल्या मुलांना राष्ट्रसेवा दलानं आत्मीयतेनं आपलंसं केलं. अनाथ आणि उपेक्षित मुलांचं "आपलं घर' आज 240 निराधार मुला-मुलींचा प्रेमानं सांभाळ करीत आहे. भूकंपात अनाथ झालेली मुले आता मोठी झाली आहेत. त्यांच्या पंखांत राष्ट्र सेवादलाने बळ दिले. ही मुले आता आनंदाने स्वतःच्या पायावर उभी आहेत. सन्मानांचं जीवन जगत आहेत. अनेक मुलींचे विवाह झाले आहेत. "आपलं घर' हे त्यांचं माहेर आहे. अनेक मुले आता बिल्डर, शिक्षक, पोलिस, इंजिनियर आणि इतर उद्योगांमध्ये आहेत. आलियाबाद टेकडीवर 24 डिसेंबर 1993 साली सुरू झालेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे.

"आपलं घर'मध्ये सध्या राहत असलेल्या मुलांसाठी 21 एकर जागेवर वसतिगृह, धरित्री विद्यालय, भोजनगृह, ग्रंथालय, कलासांस्कृतिक सभागृह, विश्रामगृह, विज्ञानशाळा, गो शाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि झाडांनी डवरलेल्या टेकडीचा समावेश आहे. पहाटे पाच वाजता उठणारी मुले अभ्यास, व्यायाम, समूहगीते आणि सेवादलाची शाखा केल्यावर सकाळी दहा वाजता शाळेत जातात. चार वाजता शाळा सुटते. त्यानंतर संगणक, चित्रकला, शिल्पकला, संगीत, शिलाई, भरतकाम, शेती, विज्ञानशाळा यांचे शिक्षण दिले जाते. "तारे समतेचे' या नावानं "आपलं घर'मधील मुले मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही सादर करतात. त्याचा निधी संस्थेसाठी वापरला जातो. "गलत मत कदम उठाओ, राह की मुसीबतोंको पार कर चलो', या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान, अमुचा देश महान', "चलो बसाये नया नगर अब,' ही आणि अशा अनेक गाण्याचा दोन तासांचा कार्यक्रम "नाचू गाऊ समतेची गाणी' या नावानं ही मुले सादर करतात.

विशेष म्हणजे, नळदूर्ग आणि आसपासचा परिसर पूर्णपणे अंधारात असताना "आपलं घर' मात्र सौर दिव्यांनी उजळलेलं असतं. रात्रीचा अभ्यास सौर दिव्यांखाली होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची येथे नियमित तपासणी होते. आहारामध्ये वैद्यकीय निकषाप्रमाणे भोजन दिले जाते. मुलांना दूध मिळावे म्हणून गोशाळा कार्यरत आहे.

"आपलं घर'चे कार्याध्यक्ष दत्ता गायकवाड म्हणाले, ""मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे प्रयत्न केला जातो. अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत संस्थेची वाटचाल सुरू आहे. पण या सगळ्यात समाधान आहे की मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे. 2 डिसेंबरला पुण्यात "आपलं घर'मधील मुलांचा मेळावा झाला. ही मुले आता आर्किटेक्‍ट, बिल्डर आणि मोठमोठ्या कंपन्यात काम करतायत. त्यांनी प्रतिवर्षी किमान एक हजार रूपये संस्थेला पाठवू असं सांगितलं. शाळेबद्दल त्यांच्या मनात अपार कृतज्ञता आहे. पुण्यात बिल्डर झालेल्या बालाजी शिंदे या तरूणाने तर कोणतीही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्‍वासन दिलं. या सगळ्यांच्या आश्‍वासनांपेक्षा ही मुले उभी राहिली याचं समाधान मोठं आहे.''

काही विचित्र अनुभवातून पुढं आलेली मुले खरोखर विलक्षण म्हणावी लागतील. एका गुन्ह्यात अमोल गायकवाडच्या वडिलांना जन्मठेप झाली. त्याचा सांभाळ करायला कुणी तयार नव्हतं. तो "आपलं घर'मध्ये दाखल झाला. आता तो एम.टेक झालाय. अनिल जांघे हा मुंबईच्या खास कमांडो पथकात आहे. राजश्री अरूण गोसावी ही मुलगी उत्तर फंड योजनेतून दहावी झाली. ती पुण्यात स्थायिक झाली आहे, असं संस्थेचे सचिव शिवाजी पोतदार यांनी सांगितले. दहावी उत्तरफंड ही योजना उच्च शिक्षणासाठी राबवली जाते. सध्या या योजनेतून 30 मुले विविध शहरांमधील महाविद्यालयांमधून उच्चशिक्षण घेत आहेत. या निधीसाठी समितीतर्फे सतत देणग्या मिळवणे, मुलांशी संपर्कात राहून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल घेणे, अडचणी सोडवणे अशी कामे केली जातात. कलावती राठोड, लांडे अशी अनेक मुले या योजनेतून पुढे आली. विभाकर सुलाखे, अप्पासाहेब बेंबळकर ही मान्यवर मंडळी त्यासाठी मार्गदर्शन करीत असतात.

शिवाजी पोतदार हे नुसते सचिव नाहीत. 21 एकर क्षेत्रावर पसरलेल्या आपलं घरच्या शाळा आणि वसतिगृहातील घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. ते स्वतः उत्तम व्हायोलिन वादक आहेत. "आपलं घर'च्या कलापथकात गाणी म्हणण्यापासून वादनापर्यंत सगळ्यात त्यांचा सहभाग असतो. संस्थेत दाखल झालेल्या काही अनाथ मुलांचे इतर नातेवाईक त्यांच्या नावाने असलेल्या इस्टेटीच्या कारणामुळे टपलेली असतात. या मुलांच्या जीवालाच धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही मुले कुठे जातात, काय करतात यावर लक्ष ठेवून त्यांना अपाय करण्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्यावर मात करण्यात यश मिळाले आहे. वयात येणाऱ्या मुलींकडं कुणी वाकड्या नजरेनं पाहत नाही ना, अशा अनेक गोष्टींकडं शिवाजींचं डोळ्यात तेल घालून लक्ष असतं.

या परिसरातील डोंगरावरील दहा एकराचे क्षेत्र संस्थेला मिळाले आहे. त्यावर 3000 झाडे लावण्यात आली आहेत. उघडे डोंगर ही नळदूर्ग भागाची खासियत आहे. हिरवाईनं नटलेले आणि वृक्षराजीनं गजबजलेले डोंगर पाण्यानं भरलेल्या ढगांना थांबवू शकतात. या भागातील पावसाच्या प्रमाणात त्यामुळं वाढ होऊ शकते. झाडं जगावीत म्हणून प्रत्येक मुलाला तीन झाडं दत्तक दिली आहेत. 2000 साली या ठिकाणी फक्त एक झाड होतं. आता हा परिसर दाट झाडांनी गजबजला आहे. गोशाळेत गायी आहेत. काही क्षेत्रावर वसतिगृहातील मुलांसाठी भाजीपाला लावला आहे. खर्चात बचत व्हायला त्यामुळे मदत होते. रोज लागणारी भाजी आपल्याच शेतात पिकवल्याने त्याचा फायदा होतो. मुलांना ताजी भाजी मिळते आणि वसतिगृहातील भोजनशाळेची सोय होते. हे भाजीचे वाफे मुले-मुली सांभाळतात. त्यांच्याकडे लक्ष देतात. हे एकप्रकारचे कृषीशिक्षणच आहे. 17 गृहमाता, वॉचमन, क्‍लार्क असा 30 जणांचा स्टाफ आहे. दर शनिवारी डॉक्‍टर तपासणी करतात. नर्स निवासी आहेत.

विविध उपक्रम
संगणक विभागात "एमएससीआयटी' परीक्षेसाठी 45 विद्यार्थी आहेत. ऑफिस ऑटोमेशन, डी.टी.पी., टॅली, डिजिटल फोटोग्राफीचे शिक्षण येथे दिले जाते. मूळचे कोल्हापूरचे असलेले जावेद नदाफ येथे निवासी शिक्षक आहेत. या विभागात मुलांना प्रामुख्याने डीटीपीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे भविष्यात कुठेही डीटीपी ऑपरेटर म्हणून त्यांना नोकरी मिळू शकते. किंवा पुढील शिक्षण घेताना या नोकरीचा हातभार स्वावलंबी होण्यासाठी लागू शकतो. इंग्रजी आणि मराठी ऑपरेटिंगमध्ये मुले-मुली पारंगत होत आहेत.
कोकणातून आलेल्या विजयाबाई बिवलकर गंगाबाई साबद्रा कक्षात शिलाई प्रशिक्षण देतात. शाळेच्या मुला-ंमुलींचे गणवेश इथेच शिवले जातात. विजयाबाई जरी कोकणातून आल्या असल्या तरी आता त्या पक्‍क्‍या मराठवाडी झाल्या आहेत. या शाळेत त्या रमल्या आहेत. एम्ब्रॉयडरी, कशिदाकाम त्यांना शिकवले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, शाळेतील सगळ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना जो गणवेश आहे, त्याचे माप घेऊन या प्रशिक्षण कक्षात ते शिवले जातात. आपणच शिवलेला गणवेश घालताना या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो अवर्णनीय असतो, असे श्री. पोतदार सांगतात.

चंदूलाल गांधी संगीत कक्षात तबला, हार्मोनियम आणि गाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्रीराम पोतदार, रूपाली, खंडू मुळे ही इथली प्रशिक्षक मंडळी. या संगीत प्रशिक्षणाचाच भाग म्हणून "नाचू गाऊ समतेची गाणी' हा कार्यक्रम तयार झाला आहे. या कार्यक्रमातून मुलांनी संस्थेसाठी पाच लाखांपेक्षा जास्त निधी जमवला आहे.
बाबासाहेब परांजपे लोकवाचनालय इथे आहे. अडीच हजार पुस्तकांचा संग्रह त्यात आहे. ग्रंथालयाबरोबरच वेगवेगळी वर्तमानपत्रेही मुलांना इथे वाचायला मिळतात.
डॉ. शरद पिशवीकर विज्ञान शाळेतून वैज्ञानिक उपकरणांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या विभागाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. आकाशदर्शन, शेती, आरोग्य, पर्यावरण कार्यशाळा इथे होतात. बळीराम जेठे त्याचं काम पाहतात. विद्यार्थ्यांना शेतीबरोबरच विज्ञानविषयक माहिती व्हावी, हा विज्ञान शाळेचा हेतू आहे. याशिवाय ज्ञानदीप बालक मंदिर, धरित्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चालवले जाते. वसतिगृहात मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वतंत्र भोजनकक्ष आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा याठिकाणी आहे. चित्रकला, शिल्पकला, भाऊसाहेब रानडे कला क्रीडा केंद्र इथे आहे. भाऊसाहेब रानडे हे राष्ट्रसेवा दलाचे पितामह मानले जातात. त्यांनी सेवादलाच्या तरूणांना शरीरसौष्ठवाचे धडे दिले. त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्र सेवादलाच्या काही पिढ्या समताधिष्ठित समाजनीतीसाठी झटत आहेत. त्यांनी कलापथकासाठीही परिश्रम घेतले होते. "आपलं घर'मध्ये भाऊसाहेब रानडे यांच्या नावाने एक व्यायामशाळाही उघडण्यात आली आहे. मराठवाड्याच्या विविधतेचे दर्शन घडवण्यासाठी एक कलादालन इथे उघडले आहे.

"आपलं घर'चं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळी शिबिरे होत असतात. राष्ट्रसेवादलाची श्रमसंस्कार शिबिरे इथे झाली आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या जन्मशताब्दीचा मोठा कार्यक्रम इथे झाला. रावसाहेब पटवर्धन हायस्कूल, पुणे, कोल्हापूर, निगवे खालसा, उदगीर व उस्मानाबाद येथील तरूण-तरूणींनी त्यात सहभाग नोंदवला. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडांचे खड्डे खणणे, बंधारे बांधणे अशी कामे या शिबिरांमधून झाली. रचनात्मक संघर्ष समिती, लोकप्रबोधन मंच, वर्ल्ड व्हिजन, सर्व शिक्षा अभियान, अभिव्यक्ती आणि छात्रभारती या समविचारी संघटनांची शिबिरे इथे होतात. त्याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होतो.

मान्यवरांच्या भेटी
राष्ट्रसेवा दलाचाच हा उपक्रम असल्याने भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, निळू फुले, मेधा पाटकर, अण्णा हजारे, सुशीलकुमार शिंदे, बाबा आढाव, . प्र. प्रधान अशा अनेक मान्यवरांनी इथे भेटी दिल्या आहेत.

शुक्रवार, २४ मार्च, २०१७

गंगा-यमुना झाल्या,भीमाई कधी जिवंत होणार?





भारतातील सर्वात पवित्र मानली जाणारी प्रदूषित गंगा आणि आपल्या संस्कृतीचं संचित वागवणारी यमुना या दोन नद्यांना उत्तराखंड उच्च न्यायालयाने जिवंत माणसांचा दर्जा दिला आहे, तो उत्तम निर्णय झाला.सोलापूर जिल्हावासीयांसाठी भीमा नदी शुद्ध होणं महत्त्वाचं आहे.भीमाई जिवंत करण्यासाठी सरकारबरोबरच सर्वसामान्य जनतेने लढा देण्याची गरज आहे.
-------------


गंगा आणि यमुनां या नद्यांना आता माणूस म्हणून वागवलं जाणार आहे. याचा अर्थ माणसावर हल्ला केला, त्याला जखमी केलं किंवा त्याचा खून केल्यावर ज्या शिक्षा आरोपींना दिल्या जातात, तशा शिक्षा या दोन नद्या प्रदूषित करणाऱ्यांना दिल्या जातील. उत्तराखंड उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निर्णय दिला आहे. न्यूझीलंडमधील व्हान्गनुई या नदीला तेथील न्याय यंत्रणेने मानवी दर्जा दिल्यानंतर त्याच धर्तीवर गंगा-यमुनेला जिवंत केले आहे. "नमामि गंगे' हा केंद्र सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. केवळ गंगेच्या शुद्धीकरणासाठी एक स्वतंत्र मंत्रालय कार्यरत आहे, त्यावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जात आहे आणि तरीही शुद्धीकरणाचे काम काही अंशानेही पुढे सरकलेले नाही, ही वस्तुस्थिती आहे.राजधानी दिल्लीजवळून वाहणाऱ्या यमुनेची स्थिती त्याहून वाईट आहे. संपूर्ण राजधानीचा मैला वाहून नेणारी यमुना ही एक गटार झाली आहे. याच यमुनेच्या पाण्यात उतरलेल्या राधेला पाहण्यासाठी श्रीकृष्ण उतावीळ झाला होता, गोपिकांची वस्त्रं त्यानं चोरली होती. आणि त्या श्रीरंगाच्या किनाऱ्यावरील केवळ अस्तित्वानं त्याच्या वर्णाप्रमाणंच पूर्णपणे निळी होऊन गेलेली राधा सलज्ज होऊन काठावर आली होती, ती यमुना प्रदूषणानं आसन्नमरण स्थितीत आहे. एकीकडे गंगेला माता म्हणून आईसारखं पवित्र मानतात. पण तीर्थ म्हणूनही तिचे पाणी मुखात घेण्यास मज्जाव केला जातो. कारण ते प्रदूषित आहे. तिचे पालकत्व "नमामि गंगे' प्रकल्पाचे संचालक, उत्तराखंड राज्याचे मुख्य सचिव आणि राज्याचे ऍडव्होकेट जनरल यांच्यावर सोपवण्यात आले आहे. हे अगदी न्यायोचित झाले.मुद्दा आहे तो भीमा नदीचा. "नमामि चंद्रभागा' प्रकल्प हाती घेऊन महाराष्ट्र सरकारने भीमा नदी शुद्धिकरणाची इच्छाशक्ती तरी दाखवली आहे. भीमा आणि सीना या दोन नद्यांमधील प्रदूषण दूर करण्यासाठी "सकाळ'ने लोकसहभागातून मोहीम हाती घेतली. त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. 2006 पासून भीमा नदीचे पुणे जिल्ह्यापासून सोलापूर जिल्ह्यातील शेवटच्या टोकापर्यंत कसे प्रदूषण होते याची माहिती मी "सकाळ'मधून वेळोवेळी प्रसिद्ध केली आहे. त्यातून ठिकठिकाणी भीमा प्रदूषणविरोधी संघर्ष समित्यांची स्थापना झाली. शिवाजी पाटील, अनिल पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलने केली. सोलापुरात त्याबाबत कार्यशाळा, परिसंवाद आणि कृतीसत्रे झाली. धर्मण्णा सादूल, ऍड. धनंजय माने, दिनेश शिंदे यांनी जनहित याचिकेची तयारी केली. परंतु महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानेच उच्च न्यायालयात अप्पर भीमेतील प्रदूषण रोखणे आम्हाला शक्‍य नाही, असे शपथपत्र दिल्याने शासकीय पातळीवरील हतबलता स्पष्ट झाली.
लोकांनी मनावर घेतले तर कितीही प्रदूषित नदीचे पुनरुज्जीवन होऊ शकते, हे लंडनमधील थेम्स नदीच्या उदाहरणाने सिद्ध झाले आहे. आणि सरकारने इच्छाशक्ती दाखवली तर प्रदूषित नदीचे सुंदर पर्यटन स्थळ होऊ शकते, हे गुजरातमधील साबरमती नदीमुळे ध्यानात येते. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीने भीमा नदीचे प्रदूषण थांबवण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. उजनी धरणातील पाण्याचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला त्याची आच असली पाहिजे. जनतेचा रेटा असेल तर कितीही नाठाळ सरकार वठणीवर येऊ शकते. इथे तर "नमामि चंद्रभागा'सारख्या प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली आहे. पुणे, पिंपरीचिंचवड भागातील भीमेला मिळणाऱ्या सर्व नद्यांचे शुद्धीकरण करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्या दोन महापालिकांचा सहभाग हवाच, पण काठावरच्या सगळ्या ग्रामपंचायती, शेतकरी, महिला, विद्यार्थी-शिक्षकांनीही जनजागरण केले पाहिजे. अप्पर भीमेतील जलप्रदूषणाची स्थिती हाताबाहेर गेली आहे. धरण गाळाने भरत आहे. धरणातले पाणी नदी पात्रात सोडले की प्रवाह प्रदूषित होतो. यासाठी लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे. भीमा नदीला मानवी दर्जा देण्यासाठी चंग बांधला पाहिजे. घोषणा करून सुस्तावलेल्या सरकारला वेठीला धरले पाहिजे. भीमा नदीचं उगमापासून शुद्धीकरण आता झाले नाही तर पुन्हा कधीच होणार नाही, हे ध्यानात घ्यावे. गांधी पिस फाउंडेशनच्या "जल थल मल' या हिंदी पुस्तकात सोपान जोशी यांनी जगभरातील वाळवंट लाखो वर्षांपूर्वी समुद्राचा एक भाग होती, असे म्हटले आहे.निसर्गात होणाऱ्या बदलाकडे लोकांचे दुर्लक्ष झाल्याने त्याचे वाळवंट झाले, असा निष्कर्ष त्यांनी काढला आहे. सोलापूर जिल्हावासियांनी दुर्लक्ष केले तर भीमा नदी पात्राचेही पुढच्या काळात वाळवंट झाल्याशिवाय राहणार नाही, हा इशारा गांभिर्याने घेतलेला बरा.
00000000000000000000