बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६



"सुंद्री' जेव्हा "सुंदर' होऊन जाते...!
सुंद्रीवादनाच्या साफल्याचा क्षण होता तो, जेव्हा नम्रता गायकवाड नावाची तरूणी आत्मविश्‍वासानं सगळ्या सभागृहाला डोलायला लावत होती....! ज्या जाणकारीनं नम्रताचं वादन सुरू होतं, ते पाहून "सुंद्री' खरोखर "सुंदर' झाली, असं म्हणावं लागेल. वाद्य आणि वादकामधील एकतानता अनुभवताना श्रोते भारावून गेले होते. आपल्या वादनानं नम्रता स्वतःच अंतर्बाह्य खुलली होती. उत्फ्फुल प्रतिसादानं ती फार मोहरून गेली नाही आणि वादनातील बहार अंशमात्रही कमी केली नाही. वादनातली आत्मतुष्टता तिच्या मुखावर विलसत होती. सुंद्रीसम्राट सिद्रामजी आणि पंडित चिदानंद जाधव संगीत महोत्सवात रविवारची सकाळ अशी सुरमयी झाली. नम्रतानं जी बंदिश सादर केली, तिचे बोल "निरागस' श्रोताही गुणगुणू शकेल, इतके स्वच्छ होते. तिच्या वादनानं सुंद्री जणू "बोलकी' झाली होती. सोलापुरातल्या ओसरणाऱ्या थंडीच्या किंचित गारव्यात हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटरमध्ये नम्रतानं आपल्या वादनानं विलक्षण ऊर्जा निर्माण केली होती. रसिकांमध्ये ती हळूहळू भिनत गेली आणि एका ऊर्जस्वी वादनाचा प्रत्यय आला. नम्रताचं रविवारचं सुंद्रीवादन आणखी पक्व होत जाईल... रसिकांची दाद तिला समृद्ध करत राहिल... आणि सुंद्री हे दुर्मीळ वाद्य नम्रतामुळं आणखी सुरेल होत जाईल..... भीमण्णांचे आजोबा सिद्रामप्पा यांनी शोधलेल्या या वाद्याचं सार्थकच झाल्याचा तो कृतार्थ क्षण होता...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःचं वादन झाल्यावर नम्रता प्रेक्षागृहात येऊन बसली. महोत्सवातील अन्य वादक, नृत्य कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेत होती, हे चित्रही तिच्यातल्या नम्र जाणिवांचं सुखद दर्शन घडवणारं होतं. हातावर "टॅटू' काढून घेण्याची तरूणाईची फॅशन नम्रतानंही केली होती, पण तिच्या दोन्ही हातांवर "सुंद्री'चं चित्र होतं आणि हातात "सुंद्री' वाद्य !

सतार आणि तबल्याची जुगलबंदी !
केशवसुतांसारख्या कवीलाही सतारीच्या बोलांनी मोह घातला होता.... संतप्त मनस्थितीत घराबाहेर पडलेला कवी एका माडीवरून ऐकू येणारे सतारीचे "दिड दा दिड दा' असे स्वर ऐकून स्वतःलाच विसरून गेला.... अगदी तसा विलक्षण अनुभव सौम्यजित पॉल आणि रवी क्षीरसागर यांच्या वादनानं आला. कोलकत्याच्या त्या तरूण सतारवादकामध्ये त्याचं वादन जणू झिरपलं होतं....ते आपल्या बोटांच्या कौशल्यानं बाहेर काढून रसिकांच्या पुढ्यात ओतण्याचं काम तो करीत होता. त्यात त्याला अतिशय सुरेख साथसंगत रवी क्षीरसागर हा तबलापटू करीत होता. साथसंगत कशी असावी, त्याचा वस्तुपाठच त्यादिवशी रवीनं दाखवला. मुख्य वादन सतारीचं आहे याचं भान कुठंही सुटू न देता, आपल्या तबल्याच्या संगतीनं सतार अधिक सुरेल करण्याचं काम रवीनं केलं. सतार आणि तबल्याचा समसमा संयोग असं त्याला म्हणता येईल. अगदी रूढ प्रतिमांचा वापर करायचा तर फुलांत सुगंध दडलेला असावा किंवा दुधात साखर मिसळून अवीट माधुर्य प्राप्त व्हावं, तसं या वादनात तबला आणि सतार एकमेकांत मिसळून गेले होते. रवीचं तबला संगतीचं कौशल्य इतकं अद्‌भूत होतं, की सतारवादक सौम्यजित त्यानं हरखून जात होता. आपल्या बोटातून "एक से बढकर एक' जादूई चीजा तो बाहेर काढत होता. रवीच्या साथसंगतीनं कित्येकदा सौम्यजित चकित होत होता; हातात तबला असूनही त्यात किती मार्दव असावं? सतारवादकाच्या नावात "सौम्य'ता पण जित मात्र रवीची झाली, असंच वाटत होतं. अर्थात सौम्यजितही कमी नव्हता. सौम्यजितचा प्रखर आत्मविश्‍वास, वादनातील नैपुण्य आणि सहजता यानं रसिक वारंवार आनंदून टाळ्या पिटत होते. शतमुखानं एकाचवेळी "व्वा व्वा'चा गजर करीत होते. सौम्यजितच्या वादनानं रसिकांच्या अंतःकरणातील सतारच छेडली होती जणू. ही सतार रसिकमनात दीर्घकाळ झंकारत राहिल...जोडीला रवीच्या तबल्याचा मधूर ठेकाही नादावत राहिल....! सौम्यजित आणि रवी... अप्रतिम अनुभवाबद्दल रसिक तुमचे ऋणी राहतील...!
पानगावचा अष्टकोनी तलाव !
वैराग-बार्शी रस्त्यावरचं पानगाव हे ऐतिहासिक महत्त्व असलेलं गाव आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावात अतिशय छान बांधलेला अष्टकोनी तलाव आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असताना या तलावात सध्या पाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणतू या गावात अनेक महिने वास्तव्याला होते. इतकेच नव्हे तर शिवाजीराजांचे नातू छत्रपती राजारामांचे पुत्र दुसरे शिवाजी. त्यांची कन्या दर्याबाईचा विवाह पानगावच्या निंबाजी निंबाळकरांशी झाला होता. रामराजे हे दर्याबाईंचे बंधू. ते पाच वर्षे पानगावात मुक्कामाला होते. डॉ. सतीश कदम आणि अन्य प्रभृतींनी या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. मुद्दा आहे तो तलावाचा. विविध लढायांच्या निमित्तानं इथं सैन्याचे तळ होते. त्यासाठी हा प्रचंड मोठा तलाव बांधला असावा, असं सांगितलं जातं. साधारण 1650 च्या सुमारासचा तो काळ. तेव्हा बांधलेला अष्टकोनी तलाव आजही सुस्थितीत आहे. त्यात पाणी आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात महिलांना पाण्यासाठी हा मोठाच आधार आहे.
या तलावातील पाणी घाण होणार नाही, याकडं लक्ष देण्याची गरज आहे. धुणी, भांडी घासणं, जनावरं धुणं किंवा तत्सम कारणांसाठी पाण्याचा वापर करताना घाण पाणी पुन्हा तलावातच मिसळतं. गावकऱ्यांनी त्याकडं लक्ष दिलं पाहिजे. तलावातून पाणी उपसून मग त्याचा आपापल्या सोयीनुसार वापर करायला हवा. तलावातच धुणी-भांडी करणं योग्य नव्हे.
पानगावप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सगळ्या गावांमध्ये पाण्याच्या सोयीसाठी पाणवठे आहेत. यंदाचा भीषण उन्हाळा लक्षात घेता, गावकऱ्यांनी गावोगावच्या या पाणवठ्यांचं श्रमदानातून पुनरूज्जीवन केलं पाहिजे. आपल्या गावाला पाणी हवं असेल तर जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन पाणवठ्यातील गाळ काढला पाहिजे, बंधारा रूंद केला पाहिजे, विहिरीतला गाळ उपसला पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्रशासन किंवा सरकारकडून टॅंकर पुरवण्याशिवाय दुसरी कृती होत नाही. आपलं गाव जलसमृद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे.
पानगावात एकेकाळी प्रचंड संख्येचं सैन्य वस्तीला होतं. अष्टकोनी तलावाचा उपयोग त्यांना होत असे. हे पारंपरिक शहाणपण गावकऱ्यांनी पुन्हा जीवित केलं पाहिजे. करमाळा तालुक्‍यातील पाडळीसारख्या गावांनी स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यामागं तिथल्या गावकऱ्यांची एकजूट कारणीभूत आहे.
पानगावातील तलावात साचलेला गाळ काढण्याचे कामही योग्य नियोजनानं केलं पाहिजे. अष्टकोनी तलावच नव्हे तर गावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरं प्रेक्षणीय आहेत. नागनाथाच्या मंदिराचं बांधकाम हा स्थापत्यशास्त्राचा अनोखा नमूना ठरू शकतो. संपूर्ण दगडी बांधकामाची रेखीवता, त्यावरचं कोरीव काम पाहताना अजिंठा-वेरूळ लेण्यांतील कलात्मकतेचा प्रत्यय येतो. तथापि, मंदिराभोवती अतिक्रमणं नसावीत. आपल्या गावातील पुरातन वास्तूंचं महत्त्व गावकऱ्यांनी ओळखलं पाहिजे, त्यांच्या ते लक्षात येत नसेल तर संबंधितांनी जनजागरण केलं पाहिजे. पानगावातील तलाव, हेमाडपंथी मंदिर, निंबाळकरांचा वाडा या ठिकाणांचा जीर्णोद्धार केला तर ते उत्तम पर्यटन स्थळ होऊ शकतं. पानगावकरांची स्थिती कस्तुरीमृगासारखी झाली आहे. आपल्या गावचा कीर्तिसुगंध महाराष्ट्रभर पोचवण्याची मोठी संधी त्यांना आहे. विद्यमान सरकारनं गड-किल्ले रक्षणाची विशेष मोहिम उघडली आहे. शिवाजी महाराजांच्या वंशजांचं वास्तव्य असलेल्या पानगावातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी मोठी निधीही मिळू शकतो. उदासीनता सोडून गावकऱ्यांनी कामाला लागलं पाहिजे, हे मात्र खरं. 
दुर्मीळ होतायत निसर्गाचे सफाई कामगार ! "गिधाड' असा शब्द उच्चारला तरी कित्येक लोक दचकतात. पण हा पक्षी अतिशय उपयुक्त आहे. निसर्गाचे सफाई कामगार मानल्या जाणाऱ्या गिधाडांची संख्या दिवसेंदिवस रोडावत आहे. 1980 मध्ये भारतात सुमारे 4 कोटी इतक्‍या प्रचंड संख्येनं असलेले हे पक्षी आज दहा लाखावर येऊन ठेपले आहेत. "इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर' या संस्थेनं केलेल्या सर्व्हेमध्ये ही बाब लक्षात आली आहे. कत्तलखान्यामध्ये मृत जनावरांची विल्हेवाट लावण्यासाठी मोठा खर्च होतो, मात्र तेच काम 600 गिधाडं विनाखर्च करतात. या खर्चाचा तपशील ध्यानात घेऊन केलेल्या आकडेमोडीनुसार; एका गिधाडाची शहरी भागात किंमत होते 6 लाख 96 हजार तर ग्रामीण भागात होते 5 लाख 85 हजार ! चार ते पाच मृत जनावरांवर प्रक्रिया करण्यासाठी दरदिवशी 15 लाख रूपये खर्च येतो. मृत जनावरांवर होणारी प्रक्रिया, त्या प्रकल्पाचा "मेंटेनन्स', वाहतूक या सगळ्याचा विचार करून ही 15 लाखाची रक्कम निघते. मध्यम स्वरूपाच्या प्रकल्पात 164400 किलो इतक्‍या मांसावर प्रक्रिया होते. वर्षभरात सहाशे गिधाडं 115200 किलो ते 172800 किलो मांस फस्त करतात. अशा स्वरूपाच्या मध्यम प्रकल्पाला ग्रामीण भागात सहा कोटी सात लाख रूपये तर शहरी भागात सात कोटी नऊ लाख रूपये लागतात. त्यावरून एका गिधाडाची शहरी आणि ग्रामीण भागातील किंमत ठरवण्यात आली. गिधाडांची संख्या घटल्यामुळं भटकी कुत्री, घुशी वाढल्या. त्यामुळं रेबीज आणि लेप्टोस्पायरोसिस या रोगांची लागण होण्याचं प्रमाण वाढलं. जंगलात कोल्हे, तरसांचा कहर सुरू झाला. प्राणी एकमेकांना मारून खायला लागल्यानं वाघांची संख्याही भविष्यात घटणार आहे. या सगळ्याचा पर्यावरणावर घातक परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. गिधाडांची संख्या वाढण्यासाठी "व्हल्चर ब्रीडिंग सेंटर्स' म्हणजेच "गिधाड प्रजनन केंद्र' निर्माण करण्याची गरज आहे. कोकणात काही ठिकाणी असा प्रयत्न झाला. वनक्षेत्रात अशी केंद्रं झाली तर हे सफाई कामगार, स्वच्छतादूत वेगानं वाढू शकतील.

मंगळवार, ९ फेब्रुवारी, २०१६

सामान्यांचा आवाज 
ज्येष्ठ उर्दू शायर निदा फाजलींच्या शायरीतून जनसामान्यांची परवड प्रकटली हे खरं, ती दूर करण्यासाठीच त्यांनी आपलं शब्दसामर्थ्य वापरलं. सामाजिक एकतेचं स्वप्न साकारावं, यासाठी त्यांच्या लेखणीतून कधी निखारे पेटले; कधी फुलं बरसली.
""फलकपे लिखी जाती है कहानी सिर्फ उनकी, कलामसे कागजही नही, दीदावरोंकी रूह छू जाती है कलम जिनकी,''असं ज्यांच्या शायरीबद्दल म्हणता येईल, त्या उर्दू शायराचा स्वर निमाला. मुक्‍तदा हसन निदा फाजली असं त्यांचं नाव. "निदा'चा अर्थच मुळी आवाज ! सर्वसामान्य माणसाच्या आक्रंदनाला त्यांनी आपल्या शायरीतून आवाज दिला. "हरेक घरमें दिया भी जले, अनाजभी हो,' अशा आशयाचं पसायदानच त्यांच्या कवितेतून व्यक्त झालं आहे. कबीर, तुलसीदासांचा प्रभाव घेऊन सुरू झालेल्या त्यांच्या कवितेला यथाशीघ्र स्वतःची वाट सापडली. मात्र त्यांच्या कवितेचं, शायरीचं अंतःसूत्र मात्र माणसाचं दुःख, माणसाच्या वेदना आणि माणसाचं जगणं हेच राहिलं. माणूस सुखी झाला पाहिजे, हे त्यांच्या शायरीतलं अध्यात्म होतं."" घरसे मस्जिद है बडी दूर, चलो ये कर लें, किसी रोते हुए बच्चेको हॅंसाया जाए'', असं त्यांनी लिहिलं आणि त्या ओळींचा मथितार्थ न समजल्यानं गहजब झाला. पण निदा फाजली निर्भिड होते. त्यांनी सांगितलं, मशिदी बनवण्यात माणसांचे हात गुंतलेले असतात, मुलांना तर प्रत्यक्ष अल्ला घडवतो. त्यांच्या या सांगण्यानं कट्टरपंथीयांचा रोष कमी झाला. अनेक शहरांतल्या गल्लीबोळात राहणाऱ्या मुलांच्या चेहऱ्यावरचं हास्य पळालं आहे, त्यांचं जगणं बोथटलं आहे. आपलं बाल्य हरवलेली ही मुलं भटकताना दिसतात, तेव्हा निदा फाजलींचं काळीज पिळवटून निघतं. सुख, समाधान, आनंद कुठं आहे, याचा शोध घेताना ते म्हणतात,"" रहेगी कबतक वादोंमे कैद खुशहाली, हरेक बार कल क्‍यूं? कभी तो आज भी हो''
दिल्लीत जन्मलेल्या निदाजींचं भारतावर निरतिशय प्रेम होतं. या देशातल्या माणसांवर प्रेम होतं. म्हणूनच त्यांचे कुटुंबीय कायमचे पाकिस्तानात गेले तरी त्यांनी आपला देश सोडला नाही. पण नंतरच्या काळात राज्यकर्त्यांच्या निर्णयामुळं ते व्यथितही झाले होते. सामान्य माणसाच्या शक्तीला दुर्बल समजण्याची चूक करू नका, सत्ता उलटवून टाकण्याची ताकद त्यांच्यात असते, असं त्यांनी बजावलं होतं. हिंदू-मुस्लिमांमधील अंधश्रद्धा, वर्णव्यवस्थेवरही त्यांनी प्रहार केले. राज्यकर्त्यांनी मंदिर-मशिद बांधण्याचे उद्योग कशाला आरंभले, अर्थात याशिवाय ते दुसरं करणार तरी काय, असं परखड मत त्यांनी एकेठिकाणी व्यक्त केलं होतं.
माणसामाणसांतील प्रेम हा त्यांच्या चिंतनाचा विषय होता. ज्याला प्रेम समजलं, त्याला जगणं कळालं. माणसाच्या जगण्याचा सारांश म्हणजेच प्रेम. आधी प्रेम करायला शिका, म्हणजे जगायला आपोआप शिकाल, असं त्यांनी लिहून ठेवलं आहे. "रजिया सुलतान'पासून त्यांची बॉलीवूडमधली मुशाफिरी सुरू झाली. पण आशयाशी तडजोड करणारी गीतरचना त्यांनी अजिबात केली नाही. "कभी किसीको मुक्कमल जहां नही मिलता, कहीं जमीं तो कही आसमां नही मिलता,'या ओळी ऐकताना कवीचं मनस्वीपण प्रत्ययाला येतं. प्रत्येकजण बोलू शकतो, पण संवाद मात्र हरवला आहे. अग्नीशीच दोन हात करायचे असतील, तर धुराचं कीर्तन कशासाठी? हा कुसुमाग्रजांना पडलेला प्रश्‍नही निदाजींनी विचारला होता.
माणसाला सदैव नाडणारी व्यवस्था, ती चालवणारे शासक, व्यवस्थेमुळं भरडून निघणारी माणसं आणि दिवसेंदिवस बिघडत चाललेलं वास्तव निदा फाजलींना अस्वस्थ करत होतं. शोषकांच्या प्रश्‍नाला सतत होकारार्थी उत्तर देऊन परिस्थिती आणखी बिघडवून कशासाठी घेता, कधी तरी "नाही' म्हणायला शिका, शोषणाविरूद्ध आवाज उठवा, असा संदेश त्यांनी जनसामान्यांना दिला. निदाजी एका अर्थानं शोषितांचा प्राणशब्द होते.