मंगळवार, २६ जानेवारी, २०१६

पाणी आणि पर्यावरणाचे अभ्यास केंद्र !
-----
शेती आणि ग्रामविकास हाच आयुष्यभराचा ध्यास घेऊन कार्यरत असलेल्या आंधळगावच्या डॉ. अप्पासाहेब पुजारी यांच्या संकल्पनेतून पाणी आणि पर्यावरण अभ्यास केंद्राची स्थापना होत आहे. मंगळवेढा तालुक्‍यातील गरीबी आणि ग्रामविकासाचा त्यांनी अभ्यास करून स्वतःचे काही मूलभूत सिद्धांत त्यांनी मांडले. त्याचप्रमाणे, डाळिंब आणि बोर फळबागांचा विकास कसा करता येईल, यावर त्यांनी प्रबंध लिहिला. सांगोला तालुक्‍यात डाळिंबाच्या फळबागा मोठ्या प्रमाणात लावल्या गेल्या, या विकास प्रक्रियेत डॉ. पुजारी यांनी लिहिलेल्या प्रबंधाचा मोठा वाटा होता. त्यातील काही तथ्यांचा विचार करून शेतकऱ्यांनी फळबागा विकसित केल्या. सांगोला, मंगळवेढ्यासारख्या दुष्काळी तालुक्‍यांमध्ये उत्तम जलव्यवस्थापन केल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केलं. बाजाराचा अभ्यास केला तर डाळिंब आणि बोर उत्पादकांना तोटा होण्याचे कारण नाही. माण खोऱ्यातील शेतीसमस्यांवर त्यांनी अनेक उपाय सुचवले आहेत. कन्नड मातृभाषा असूनही मराठी भाषेवर प्रभूत्व असणारे डॉ. पुजारी नेहमी नवनवीन प्रयोगांमध्ये रमलेले असतात. त्यांनी कमी क्षेत्रावर जास्त उत्पादन देणाऱ्या तुरीची लागवड केली. हा प्रयोग आधी स्वतःच्या शेतात त्यांनी यशस्वी करून दाखवला. महाराष्ट्राच्या विविध भागात फिरून शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगांची प्रत्यक्ष पाहणी ते सतत करीत असतात. कर्नाटकातील अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांशी ते संबंधित आहेत.
आपल्या अभ्यासाचा विषय अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी पाणी आणि पर्यावरणाच्या अभ्यासकांसाठी आंधळगावातील आपल्या फार्महाऊसमध्येच अभ्यास केंद्र काढले आहे. या विषयावरची अनेक पुस्तकं त्यांनी तिथं ठेवली आहेत. शेतकरी, विद्यार्थी आणि अभ्यासकांना त्याचा फायदा होऊ शकतो. सोलापूर जिल्ह्यातील उजनी धरणामुळे शेतकऱ्यांचा फायदा झाला आहे, पण तो चिरकाळ टिकणार आहे का? "एनटीपीसी'सारखा प्रकल्प सोलापूर जिल्ह्यातील प्रदूषण वाढवणार आहे, त्याविषयी नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. या प्रकल्पाला सर्वाधिक पाणी लागते, जे उजनी धरणातून उचलले जाणार आहे. सोलापूर जिल्ह्याचे पर्यावरण या प्रकल्पाने धोक्‍यात आणले आहे, दुसरीकडं माळढोक अभयारण्याचं क्षेत्र कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत. महाराष्ट्राचा राज्य पक्षी म्हणून माळढोकचा विचार एकेकाळी सुरू होता, पण दिवसेंदिवस त्याची संख्या घटते आहे. जमिनींची खरेदीविक्रीला मज्जाव आणि तत्सम अनेक गोष्टींमुळे शेतकऱ्यांना माळढोक आपला शत्रू वाटतो आहे. त्यामुळेही त्याची गुपचूप हत्या केली जात असावी. त्याबाबत जनजागरण करून सोलापूरचं पर्यावरण समृद्ध करण्याची गरज आहे.
उद्योगधंदे वाढत नसतानाही सोलापूर शहराचं प्रदूषण प्रचंड वाढत आहे. प्रदूषित पाणी लोकांना प्यावं लागत आहे. शुष्क नद्या भयावह ठरत आहेत. या सगळ्याचा अभ्यास करून त्यावर नेमके उपाय शोधण्यासाठी डॉ. पुजारी यांनी स्थापन केलेल्या पाणी आणि पर्यावरण केंद्राचा फायदा होणार आहे. फक्त सोलापूर जिल्हाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या पाणी व पर्यावरणाचा तपशील इथं पुढच्या काळात उपलब्ध असेल. आर्थिक विकास आणि पर्यावरण यांची सांगड घालताना शेतकरी, कष्टकरी आणि सामान्य माणसाचा एकत्रित विचार होणं गरजेचं आहे. प्रशासन, सरकारी यंत्रणा आणि उद्योजक अशा सगळ्यांना दिशादर्शक असं काम या अभ्यासकेंद्रातून होणार आहे.

मंगळवार, १९ जानेवारी, २०१६

सोलापूरच्या मातीतला विद्वान संपादक !

क्रिकेटपटू बापू साम्राणीच्या जोडीनं जोरदार बॅटिंग करणारा फलंदाज म्हणून अरूण टिकेकर सोलापूरकरांच्या लक्षात आहेत. त्यावेळी प्रसिद्ध असलेल्या सातरस्त्याकडून रंगभवनकडं जाणाऱ्या मार्गावर गरूड बंगल्यानजीक ते राहत. हरिभाई देवकरण प्रशालेचे ते विद्यार्थी. अगदी बालपणापासूनच वृत्तीत गांभिर्य आणि हुशारी असल्यानं अरूण टिकेकर हे वेगळं व्यक्तिमत्व आपला ठसा उमटवून जाई. "अक्षरनिष्ठांची मांदियाळी' हे ग्रंथशोध आणि ग्रंथसंग्रहाबद्दलचं त्यांचं पुस्तक अगदी अलीकडं प्रसिद्ध झालं. पण टिकेकरांचं घराणं सोलापुरात ओळखलं जातं ते पुस्तकप्रेमी आणि वाचनसंस्कृतीचा प्रसार करणारं म्हणूनच. त्यांचे वडील सोलापुराकरांना "दूतमामा' म्हणून परिचित आहेत. दुतांचं "फिरतं वाचनालय' ही त्यांची संकल्पना अद्‌भूत होती. आता ग्रंथ घेऊन गावोगावी फिरणाऱ्या "व्हॅन' दिसतात. पण टिकेकरांचे वडील सायकलवर ग्रंथसंभार घेऊन घरोघरी जाऊन वाचनालय चालवत. पुस्तकांची आवड त्यांच्यात निर्माण झाली ती अशी वारसाहक्कानं. ग्रंथसंस्कृती विकसित करण्यासाठी पुढं अरूण टिकेकर आणि त्यांचे बंधू अरविंद टिकेकर यांनी मोठं काम केलं, त्यासाठी "दूतमामां'प्रमाणेच श्री. रा.टिकेकर या त्यांच्या काकांचही योगदान मोठं होतं. ज्या वृद्धांना वयामुळं वाचनालयात येऊन पुस्तकं घेणं कठीण होतं, त्यांना ती घरी नेऊन दिली पाहिजेत, असं ते म्हणत.
मुंबई विद्यापीठाचा इतिहास शब्दबद्ध करणारा "ज्ञानसागरू' हा त्यांचा ग्रंथ नंतर सिद्ध झाला, पण शालेय वयात, सोलापुरातल्या हरिभाई देवकरण प्रशालेतच हुशार आणि बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांनी लौकिक मिळवला होता. शिक्षकदिनी विद्यार्थ्यांनी शिक्षक होऊन अध्यापनाची परंपरा तेव्हापासूनची. अरूण टिकेकरांना शिक्षकदिनी मुख्याध्यापक केलं जाई आणि प्रिन्सिपॉल मंगळवेढेकरांच्या कक्षात त्यांच्या खुर्चीवर विराजमान केलं जाई. मंगळवेढेकर सर प्रचंड शिस्तीचे. त्यांच्या खुर्चीत शिक्षकदिनी टिकेकरांना विराजमान होण्याची संधी मिळे, ही त्यांच्या बुद्धिमत्तेची चुणूक ठरावी. पुढं चालून हा विद्यार्थीच "ज्ञानसागरू' ठरणार याची ती पूर्वखूण म्हणता येईल. 1961 साली हरिभाई देवकरण प्रशालेत दहावी उत्तीर्ण झालेल्या अनेक विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात नाव कमावलं. त्या सगळ्यांचं स्मरणरंजन असलेला एक ग्रंथ टिकेकरांनी संपादित केला, त्याला "शिस्तीतलं मुक्तांगण' असं नाव दिलं. ह. दे. प्रशालेचे मुख्याध्यापक; त्यांना प्रिन्सिपॉल के. पी. मंगळवेढेकर असंच सारेजण म्हणतात; त्यांची करडी शिस्त आजही अनेकांच्या आठवणीत आहे, त्या शिस्तीत या विद्यार्थ्यांनी जे "मुक्तांगण' अनुभवलं त्यावरून दिलेलं हे शीर्षक अन्वर्थक आहे.
"महाराष्ट्र टाइम्स', "लोकसत्ता', "टाइम्स ऑफ इंडिया'सारख्या वर्तमानपत्रांमध्ये संपादक आणि "सकाळ'चे संपादक संचालक म्हणून त्यांनी पुढच्या आयुष्यात काम केलं, पण त्याचा पूर्वसूर संगमेश्‍वर महाविद्यालयातल्या "स्टुडुंट कॉलिंग'च्या भित्तीपत्राच्या संपादनात होता. त्यातलं टिकेकरांचं लेखन आणि संपादन कौशल्य यामुळं त्यावेळचे प्राचार्य डॉ. भोगिशयना यांचं त्यांच्याकडं लक्ष गेलं. त्यांनी या विद्यार्थ्यातली हुशारी जोखली. पुढं ते त्यांचे लाडके विद्यार्थीच झाले. पण फक्त प्राचार्यांचेच ते आवडते नव्हते तर क्रिकेटमधल्या त्यांच्या नैपुण्यामुळं ते विद्यार्थ्यांमध्येही अतिशय प्रिय होते, त्याचं उदाहरण म्हणजे संगमेश्‍वर महाविद्यालयात त्यांना विद्यार्थ्यांनी "जी.एस.' (जनरल सेक्रेटरी) म्हणून बिनविरोध निवडून दिलं.
"समाज स्पंदन' टिपण्याचं त्यांचं कौशल्य सोलापूरसारख्या बहुभाषिक शहरानं त्यांचं जे संगोपन केलं त्यामुळं वाढीस लागलं. विवेकवादी, विचारशील, बुद्धिवादी संपादक म्हणून त्यांनी ख्याती मिळवली, त्याचं भरणपोषण सोलापूरच्या मातीतल्या सर्वधर्मसमभावाच्या जाणिवेनं झालं होतं. उद्योजक अन्वर सैफन, म्हैसकर कुटुंबीय (मुख्यमंत्र्यांचे सचिव मिलिंद म्हैसकर यांचे निवासस्थान), अश्‍वत्थ वृक्षानं वेढलेल्या रमणीय घरात राहणारे जेऊरकर कुटुंबीय यांच्यासारख्या शेजाऱ्यांमुळं त्यांची समाजाबद्दलची जाणीव व्यापक होत गेली. सोलापूरच्या संतपरंपरेचा संस्कार त्यांच्यावर होताच, म्हणूनच "कान्होबा, तुझी घोंगडी चांगली रे, आम्हासि का दिली वांगली रे', या अभंगाचं शीर्षक करून टिकेकरांनी लिहिलेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या वादाचा लेख ठाकरेंना तर झोंबलाच, पण महाराष्ट्रात प्रचंड गाजला. "जशास तसं' वागण्याचं बाळकडू सोलापूरकरांमध्ये आहे. एरवी विवेकवादी विचारांनी त्यांची लेखणी संयमाने चाले, पण सोलापूरच्या मातीत असलेली अगम्य धाडसी वृत्तीही त्यांनी दाखवली. एखाद्याच्या तोंडावर परखडपणे बोलण्याचं धैर्य सोलापुराकरांमध्ये पुष्कळच आहे.
सोलापूरचे साहित्यिक द. रा. बेंद्रे, चित्रकार ए. ए. आलमेलकर, क्रिकेटपटू पॉली उम्रीगर, प्रा. श्रीराम पुजारी, ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य, प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख, प्राचार्य भोगिशयना डॉ. निर्मलकुमार फडकुले ही त्यांची श्रद्धास्थानं होती. अरूण टिकेकरांची प्रगल्भता या सर्वांनी ओळखली होती. प्रा. त्र्यं. वि. सरदेशमुख यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला. त्याच्या वितरण समारंभास सरदेशमुख सर दिल्लीला जाऊ शकले नाहीत, म्हणून साहित्य अकादमीनं तो कार्यक्रम सोलापुरात करायचा ठरवला. तेव्हा सरदेशमुखांसारख्या ऋषितुल्य व्यक्‍तीला कुणाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करायचा, हा प्रश्‍न निर्माण झाला. स्वतः सरदेशमुखांनीच अरूण टिकेकरांचे नाव सुचवून तो सोडवला.
"सकाळ'चे संपादक संचालक म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर 2005 मध्ये "सकाळ'च्या मुंबईतल्या फोर्ट कार्यालयात त्यांच्याशी काहीवेळा संवाद झाला. विधानसभा अधिवेशनाचं रिपोर्टिंग करण्यासाठी माझा तेव्हा मुंबईत मुक्काम होता. पुढं सोलापुरात अनेक कार्यक्रमांना ते पाहुणे म्हणून येत. सोलापूर श्रमिक पत्रकार संघानं ज्येष्ठ पत्रकार रंगाअण्णा वैद्य स्मृती पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला, त्यावेळी त्यांचा परिचय करून देण्याची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्यांच्याशी न बोलता, त्यांच्याबद्दल इतकी माहिती कशी गोळा केली, याबद्दलचं आश्‍चर्य आणि समाधान त्यांनी कार्यक्रमानंतर माझ्यापाशी व्यक्त केलं.
अलीकडं त्यांचं "कालान्तर' हे पुस्तक प्रसिद्ध झालं. हरिभाई देवकरण प्रशालेतल्या शाळुसोबतींबरोबर 23 जानेवारीला पुण्यात श्री. मुस्तीकरांकडं त्यांचं स्नेहसंमेलन व्हायचं होतं. आठवणीतलं सोलापूर तिथं आणखी उजळलं असतं. नटवर्य शशिकांत लावणीस, ऍड. जे. जे. कुलकर्णी ही त्यांची मित्रमंडळी सोलापुरातून तिकडं जाणार होती. पण टिकेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सोलापूरकरांच्या स्मरणात मात्र ते कायम असतीलच...! सोलापूरच्या पत्रकारितेत येऊ इच्छिणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचीच एकच इच्छा असते, "मला अरूण टिकेकर व्हायचंय...!' ते खूपच कठीण आहे, कारण "या सम हाच..!'

सोमवार, ११ जानेवारी, २०१६

नेहमीपेक्षा वेगळी वाट!
-------
मुलांचं करिअर घडवताना पालकांची परवड होत असल्याचं चित्र सध्या सर्रास आढळतं. आपल्याला आयुष्यात नेमकं काय करायचं आहे, हेच अनेक पालकांना अखेरपर्यंत कळत नाही. त्यामुळं आपल्या पाल्यांनी डॉक्‍टर, इंजिनिअर किंवा तत्सम प्रतिष्ठित व्यवसायात पदार्पण करावं, असं त्यांना वाटत असतं. "भरपूर पैसा कमावणं म्हणजे यशस्वी जीवन', असा काहींचा समज असतो. त्यातून गडबडी होतात. मात्र निश्‍चित असं ध्येय उराशी बाळगून; आपल्या आवडीच्या क्षेत्रातच करिअर केलं तर पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी आणि मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जरूर मिळतं. सोलापूरच्या रेणूप्रसाद पत्की या तरुणानं आपल्या करिअरची वाट स्वतः निवडली आणि आज तो यशाच्या शिखरावर आहे. जर्मन भाषेत तो जर्मन कवी आणि कवयित्रींच्या काव्य संवेदनांवर पीएचडी करीत आहे.
हे सगळं कसं साधलं, त्याची हकिगत सगळ्या "करिअरिस्ट' तरुण-तरुणींना उद्‌बोधक ठरेल. दहावीमध्ये उत्तम गुण मिळवल्यानंतर प्रसादनं अकरावीसाठी थेट पुण्यातलं एस.पी. कॉलेज गाठलं. तिथं अकरावीपासूनच जर्मन भाषा निवडून त्याच भाषेत बीएची आणि पुढं अधिक अभ्यास करून एमएची पदवी मिळवली. यादरम्यान, जर्मन भाषेत निबंध स्पर्धेत सहभागी होणं, जर्मन साहित्याचा मराठीत आणि मराठी साहित्याचा जर्मन भाषेत अनुवाद करण्याचं काम तो करीत होता. त्याचे वडील हेमकिरण पत्की महाराष्ट्रातील नामवंत कवी. त्यामुळं साहित्य-कवितांची प्रसादची जाण चांगलीच विकसित होत गेली. तो स्वतः उत्तम कविता करतो. "मौज', "हंस' अशा मान्यवर दिवाळी अंकांमधून त्याच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. "केल्याने भाषांतर' या अनुवादाला वाहिलेल्या मासिकात त्याने जर्मनमधून मराठीत अनुवादित केलेल्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. इतकंच नाही तर मराठीतून जर्मनमध्ये अनुवादित केलेल्या अनेक लघुकथा "वूल्फगॅंग बोर्चेर्ट' या जर्मन भाषेतील नियतकालिकात प्रसिद्ध झाल्या आहेत. हरमान हेसे या जगप्रसिद्ध जर्मन साहित्यिकाचं साहित्य त्यानं मराठीत अनुवादलं आहे. पुणे विद्यापीठातील अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्याने आपला सहभाग नोंदवला आहे. साहित्य, कथा, कवितांवरच्या प्रेमापोटीच हे सगळं घडल्याचं तो सांगतो. कवयित्री कविता महाजन आणि जर्मन कवयित्री ऊला हान यांच्या प्रेमकवितेतील साम्यस्थळं या विषयावर नुकतंच त्यानं जर्मनीत जाऊन प्रबंधाचं सादरीकरण केलं. त्यासाठी त्याला शिष्यवृत्ती देऊन विशेष निमंत्रित केलेलं होतं, याआधीही तो एकदा जर्मनीला जाऊन आला आहे.
जर्मन भाषा शिकून त्यातच करिअर करणं सहज शक्‍य आहे, असं प्रसाद सांगतो. एकट्या पुण्यात 350 जर्मन कंपन्या कार्यरत आहेत. त्यांना अनुवादक, इंटरप्रिटेटर कायम लागत असतात. त्यांच्याकडं नोकरी आणि अर्थार्जनाच्या प्रचंड संधी उपलब्ध आहेत. सध्या एका जर्मन वेबसाइटसाठी "कंटेंट' लेखनाचं काम प्रसाद करीत आहे. एका तासाला किमान एक हजार रुपये अशी प्राप्ती त्यासाठी होते. जर्मन भाषांतराच्या कामातूनही चांगली प्राप्ती होऊ शकते. एका शब्दाच्या भाषांतरासाठी कमीत कमी तीन रुपये मिळतात. घरी बसूनही हे काम करता येतं. पुण्यातल्या अनेक शाळांनी आठवीपासून जर्मन भाषा शिकवायला सुरवात केली आहे. त्यांना उत्तम शिक्षक हवेच असतात. शिवाय जर्मन भाषा शिकवणाऱ्या क्‍लासेसची संख्या प्रचंड वाढतेय. त्यामुळं जर्मन भाषा शिकणं ही अत्यंत फायद्याची, जीवनाला यशस्वी कलाटणी देणारी गोष्ट आहे यात शंका नाही. उत्तम जर्मन जाणणाऱ्याला भारतातच मोठी संधी आहे. तीच गोष्ट फ्रेंच, जपानी आणि चीनी भाषा शिकणाऱ्यांबाबत आहे. याखेरीज जर्मनीतही जर्मन व इंग्रजी जाणकारांना उत्तम संधी आहे. प्रसादसारखा हुशार, प्रतिभावान तरुणच म्हणूनच सांगतो, "रुळलेली वाट सोडा आणि स्वतःचा नवा मार्ग तयार करा.' ज्याचं मूर्तिमंत उदाहरण तो स्वतःच आहे!

सोमवार, ४ जानेवारी, २०१६

अमन की शम्मा जला के साथ चलो....
------
स्वतःवरचाही विश्‍वास उडावा, असे हे दिवस. जागरणाचे आचके देत निद्रिस्त असलेला समाज. डाव्या हातानं उजव्या हाताचा संशय घ्यावा, असं तप्तसंदिग्ध वातावरण. मग कुठून तरी हात हाती घेऊन चालण्याचा उद्‌घोष होतो. तरीही मनाला समाधान होत नाही. नुसते हात हाती नकोत तर त्वेष आणि द्वेष झटकून शांतीचा संदेश घेऊन बरोबर चालूया, असं सांगणारी कविता जन्माला येते. तिची भाषा उर्दू असते आणि कवी एजाज नबी कारीगर ! तोंडदेखल्या गप्पा आणि उसवत चाललेल्या नातेसंबंधानं माणसं कसनुशी होत चालली आहेत. अशावेळी आशेचा किरण दाखवणारी रचना माणुसकीचं दर्शन घडवते. श्री. कारीगर यांनी उर्दूमधून ज्या काव्यरचना केल्या आहेत, त्या "बर्गे हिना' (म्हणजे "मेंदीचं पान') काव्यसंग्रहात आहेत. मेंदी खुलवायची असेल तर तिचं पान जास्तीत जास्त ठेचलं पाहिजे. आपलं जीवन फुलवायचं असेल तर स्वतःला जास्तीत जास्त उपसलं पाहिजे.
आयुष्य सुंदर आहे. ते एकदाच मिळतं. ही सुंदरता वाढवण्याचं काम माणसं स्वतःच करतात आपल्या वर्तनानं. आपण इतरांशी जसे वागतो, तसं लोक आपल्याशी वागतात. उदासवाणे क्षण फेकून आनंदाचे गाणे गायले पाहिजे, त्यासाठी मन अलौकिक अशा शांतीनं पुरेपूर भरलेलं असायला हवं.
सुमारे चाळीस वर्षं शिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडताना श्री. कारीगर यांनी परीक्षार्थींना उत्तीर्ण केलं नाही तर मनःपूर्वक विद्यार्थी घडवले. त्यांना माणसं जोडायला शिकवलं. आपल्या कवितेतून जे सांगितलं, ते आचरणातून दाखवलं. स्वातंत्र्य उपभोगणं म्हणजे उन्माद नव्हे तर अनेक मातांचे अश्रू सहृदयतेनं पुसणं, अनेक निष्पाप बालकांना अनिकेत होण्यापासून राखणं. द्वेष, नफरत मिटवण्याचा संदेश त्यांनी दिला.
सोलापूर ही कामगारांची नगरी. इथल्या माणसांच्या श्रमावर श्रीमंतांचे महाल उभे आहेत. "मजदूर' ही कारीगर यांची कविता मजुरांच्या व्यथांचं बोलकं चित्रण करणारी आहे. साहिर लुधियानवी यांच्या कवितांचा ठसा कारीगर यांच्यावर उमटलेला आहे. कित्येकांची घरं, इमारती आणि महाल बांधणाऱ्या हातांना मात्र अंधाराशी सलगी करतच दिवस कंठावे लागतात. किंवा दुसऱ्याचं ऐश्‍वर्य खुलून दिसावं म्हणून रेशमी वस्त्र विणणाऱ्यांच्या अंगावर धडके कपडेही नसावेत, हा विरोधाभास माणसाला अस्वस्थ करीत राहतो. मजुरांच्या जगण्याप्रमाणेच व्यसनाधीनता, हुंडा अशा समाजविघातक रूढींवर त्यांनी प्रहार केला आहे. हुंड्याचं स्वरूप वेगळं होत आहे, पण हुंड्याची प्रवृत्ती कायम आहे. तीच गोष्ट दारूमध्ये आयुष्य बुडवून टाकणाऱ्यांची. दारूच्या थेंबात मृत्यूचं तांडव असतं, असं ते म्हणतात. जीवनाविषयी, जगण्याविषयी आणि माणसांविषयी आत्यंतिक जिव्हाळा असणारा हा कवी आहे. म्हणूनच सोलापुरातल्या उर्दू शाळेमधल्या मुख्याध्यापकांना व्याधीमुक्त होण्यासाठी स्वतःबरोबरच आपल्या मित्रांकडून "मुशायऱ्या'च्या माध्यमातून त्यांनी निधी जमा केला. एका उर्दू कवीलाही अशीच मदत केली. एवढंच नाही तर उस्मानाबादच्या शम्सूल हायस्कूलमधील गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली.
"जाऊ तिथं सुगंध निर्माण करू', अशा वृत्तीनं कारीगर सेवारत आहेत. कवीचं हृदय आणि माणसाचं मन घेऊन त्यांची वाटचाल सुरू आहे. उर्दू भाषेवर प्रेम करणारा, इतरांनाही ती समजावी म्हणून शिकवत राहणारा हा अफलातून कवी एकात्मभाव जागवत आहे. आणि आजच्या काळाची तीच तर गरज आहे, नाही का? 

शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

स्मार्ट सिटी -
उद्याचे वास्तव की भूलभूलैय्या...

एक काळ होता, जेव्हा पुण्याहून मुंबईला पोचण्यासाठी प्रदीर्घ वेळ लागत होता. वाहनचालक हैराण, प्रवासी तर जीव मुठीत धरून बसत. पोलिसांपुढं दरदिवशी नवं आव्हानं. यावर विचार झाला आणि या दोन शहरांना जोडणारा द्रुतगती मार्ग सुरू झाला. लोकांकडूनच पैसे वसुलीची क्लृप्ती वापरून टोलप्लाझा झाला. किमान ८० च्या स्पीडनं वाहन पळवण्याचा नियमच झाला. जड वाहनांसाठी वेगळी मार्गिका. कुठं अपघात झाला किंवा काही मदत हवी असल्यास विशिष्ट अंतरावर टेलिफोन आणि मदतकेंद्र. प्रवासाला तासभर झाला की विश्रांतीसाठी खास ढाबे वगैरे. आरंभी याचं किती कौतूक झालं. पण आज या रस्त्याला द्रुतगती मार्ग म्हणणं म्हणजे वाकुल्या दाखवण्यासारखं झालं आहे. दोन-तीन दिवसांच्या सुट्या लागून आल्या आणि पुणे-मुंबईतील वाहनं या रस्त्यावर आली की वाहतुकीचा खोळंबा होतो, एखादा अपघात होतो, त्यानं माणसं त्रस्त आणि वाहतुकीचं व्यवस्थापन करणारी यंत्रणाही. (अशी यंत्रणा शोधावी लागते हेही तितकंच खरं) कार-जीपसारखी छोटी आणि बस-ट्रकसारखी अवजड वाहनं एकाच गतीनं धावताना दिसतात. त्यात कुणी कुणाला आडवं गेलं की संपलंच सगळं. वाहतुकीची कोंडी झाली की आठ आठ तास खोळंबून बसायला लागतं. म्हणजे करायला गेलो एक आणि झालं भलतंच, अशी परिस्थिती.
समस्येचा अतिरेक परिस्थितीत गुणात्मक बदल घडवून आणतो, असं कार्ल मार्क्सचं एक वचन आहे. वाहतूकच नव्हे तर शहरांत राहणाऱ्या सगळ्याच नागरिकांना रोज वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं. अडचणी एकदा अंगवळणी पडल्या की त्यांची सवय होते, मग फुटलेल्या गटारी ओलांडत रस्त्यावरून उड्या मारत चालणं, फुटपाथवर झालेल्या अतिक्रमणांकडं कानाडोळा करीत तिथूनच गरजेच्या वस्तू खरेदी करणं, ठरलेल्या वेळा टाळून येणाऱ्या सिटीबस किंवा लोकल रेल्वेचा वापर करणं, प्रमाणापेक्षा जास्त प्रवासी झाल्यानं मेटाकुटीला येऊनही हसत प्रवास करणं, एक ना दोन, अशा अनेक गोष्टी आपण सहन करीत असतो. मात्र प्रवास सुखकर व्हावा, सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहने वेळेवर यावीत आणि आपल्याला बसायला त्यात जागा मिळावी, संबंधित कर्मचारी आपल्याशी सौहार्दानं वागावा असं आपल्याला वाटत असतं. फक्त प्रवासाचंच नव्हे तर जगण्याच्या सगळ्या अंगांचा विचार करून नेटकी प्रणाली विकसित झाली तर.... असं होणं शक्य आहे का... भारतासारख्या सव्वाशे कोटी लोकसंख्येच्या देशात हे कसं होईल, असं आपल्याला वाटतं ना.... पण स्मार्ट सिटीची योजना देशात येऊ घातली आहे. परदेशातल्या वाहतूक व्यवस्थेचे गोडवे आपण गातो, तिथल्या प्रशासनाची स्तुती करतो, वेळेला महत्त्व देण्याच्या त्यांच्या वृत्तीचं आपण कौतूक करतो. भारतात हे सगळं शक्य आहे. त्यासाठीच आकाराला येतेय स्मार्ट सिटीची योजना.

स्मार्ट सिटी म्हणजे काय....
स्मार्ट फोन, स्मार्ट पॅड, संगणकातील स्मार्ट फ्लो प्रणाली आणि तत्सम स्मार्ट गोष्टी आपल्याला ठाऊक आहे. स्मार्टसिटीत स्मार्ट इकॉनॉमी, स्मार्ट मोबिलिटी, गर्व्हर्नन्स, पर्यावरण, जीवनमान आणि तिथं राहणारी माणसंही स्मार्ट असतील. एका आकडेवारीनुसार, जगभरामध्ये १८०० साली शहरी लोकसंख्या ३ टक्के होती. १९५० साली ती २९ टक्क्यांवर पोचली. २००८ मध्ये जगातील ५० टक्के लोकसंख्या शहरी झाली आहे. २०४० मध्ये जगातील ६५ टक्के लोकसंख्या नागरी होईल. ग्रामीण भागातून शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर होत असलेलं स्थलांतर लक्षात घेतलं तर कदाचित ही टक्केवारी वाढू शकते. भारतात गावच्या गावं उठून शहरात येतात. उत्तरप्रदेश-बिहारमध्ये अशी खूप उदाहरणं देता येतील, अगदी आपल्या कोकणातील प्रत्येक घरामधला एक माणूस मुंबईत आहे. गणेशोत्सव आणि अन्य कार्यक्रमांसाठी गावाकडं जाणाऱ्या या चाकरमान्यांचे प्रवासात काय हाल होतात याची सुरस वर्णनं त्या त्या वेळी वर्तमानपत्रांमधून येत असतात. वाढती लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण, लहरी हवामान, घटते पाऊसमान आणि कर्जबाजारी शेतकरी याचा परिणाम शहरांवर होतो आहे. ताण वाढल्याने अनेक समस्या, रोगराई वाढते आहे. स्मार्टसिटीत नियोजनबद्ध रीतीनं सगळ्याचं नियंत्रण केलेलं असेल. म्हणजे ज्या वाहतुकीचा विचार आपण आरंभीच केला, ती स्मार्टसिटीत कायम उत्तम स्थितीत असेल. एकावेळी कितीही वाहने रस्त्यावर आली तरी वाहतुकीची होणार नाही. त्यासाठी आँटोमेटिक ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा असेल. वाहने वाढल्याचे लक्षात आल्यास वाहनांचे मार्ग बदलून दिले जातील. सिग्नलचे टायमिंग बदलेल, पुढे काही गडबड आहे, असं लक्षात आल्यानंतर अलिकडच्या स्टेशनवर रेल्वे गाडी ज्याप्रमाणे रोखून ठेवली जाते, त्याप्रमाणे विशिष्ट वेळेसाठी रस्त्यावरील वाहतूकही थांबवली जाईल. ज्यामुळे पुढं होणारी कोंडी वाचेल. रस्त्यावर अपघात झाला किंवा वाहन अचानक बंद पडले तर क्लोज सर्किट टीव्हीमुळे त्याची माहिती तातडीनं कळेल. मदतीसाठीची वाहने तत्काळ संबंधित ठिकाणी पोचू शकतील. लंडनमध्ये अशी स्मार्ट ट्रॅफिक पद्धत आहे. वाहतुकीची मिनिट टू मिनिट खबर ठेवली जाते.
घटना लंडनमधलीच आहे. आपलं भारतीय कुटुंब लंडनला पाहुण्यांकडं गेलं होतं. सार्वजनिक बसनं प्रवास सुरू होता. नवरा-बायको आणि त्यांचं वर्षभराचं मूल. थोडं अंतर गेल्यावर त्या छोट्या बाळानं शी केली. आपलं भारतीय कुटुंब स्मार्ट होतं. बाळाच्या आईनं त्याची शी पुसली. बरोबर वर्तमानपत्र होतं, त्याच्या कागदात तो बोळा तयार केला. परदेशात असल्यानं रिस्क नको म्हणून तिनं खरेदी केलेल्या एका वस्तूची कॅरीबॅग काढून तिच्यात हा बोळा घातला. कुणी पाहत नाही, असं बघून बसच्या खिडकीबाहेर ही पिशवी दिली फेकून. दुसऱ्या दिवशी वाहतूक पोलिस लंडनमधल्या त्या पाहुण्यांच्या दारात हजर. त्यांनी ती पिशवी त्यांचीच असल्याची खात्री करून त्यांच्या ताब्यात दिली. हे आपले भारतीय पती-पत्नी आतल्या खोलीतून बाहेर आले, पाहतात तर काल बाळानं शी केलेल्या बोळ्याची बसबाहेर फेकून दिलेली पिशवी घेऊन पोलिस आलेले. त्यांना वाटलं, प्रवासात चुकून ही पिशवी बसबाहेर पडली असावी.... स्वतःच्या हातानं पिशवी बाहेर फेकलेल्या दाम्पत्याला लंडनचे पोलिस म्हणत होते, सॉरी, पिशवी आणून द्यायला २४ तासांचा उशीर झाला. भारतीय दाम्पत्य ओशाळलं नसेल तरच नवल. हे शक्य झालं स्मार्ट वाहतुकीमुळं. स्मार्ट वाहतूक केवळ ट्रॅफिक किंवा त्यामुळं होणाऱ्या कोंडीशी निगडीत नाही. म्हणजे तो मुद्दा तर प्राधान्यक्रमावर आहेच, त्याशिवाय ती आहे पर्यावरणाशी संबंधित.


वाढती वाहने आणि प्रदूषण
वाहनांमुळं होणारं प्रदूषण हा अनेक महानगरांमध्ये कळीचा मुद्दा झाला आहे. मुंबईसारख्या अवाढव्य नगरात प्रदूषणामुळं दुर्धर रोग ओढवून घेतलेले अनेक लोक आहेत. पर्यावरणाशी मैत्री करणारी वाहतूक हे स्मार्ट शहराचं वैशिष्ट्य असेल. वाहनातून बाहेर सोडल्या जाणाऱ्या कार्बन डाय आँक्साईडच्या प्रमाणाचं नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्याचा प्रयत्न केला जाईल. रस्त्याच्या दुतर्फा झाडं लावलेली असतीलच. वाहनांमधून बाहेर पडणाऱ्या धुराचं प्रमाण वाहन बनवणाऱ्या कंपनीकडूनच नियमित करून घेतलेलं असेल. रस्त्यावर कचरा आणि घाणीचं साम्राज्य नसेल. रस्त्यावर थुंकण्याची, लघवी अथवा शौचाला बसण्याची भारतीय मानसिकता स्मार्टसिटीत राहताना बदलावी लागेल. पदपथ, सायकलसाठीचा खास मार्ग आणि अन्य वाहनांसाठीची व्यवस्था असे वर्गीकरण केलेले असेल. पदपथावरील विक्रेते, त्यांनी केलेलं अतिक्रमण याचं आपल्याला काहीही वाटत नाही. मुंबईतल्या दादर भागात ट्रॅफिक पोलिस आणि रस्त्यावर अतिक्रमण केलेल्या विक्रेत्यांचं संगनमत असतं. महापालिकेची अतिक्रमण हटाव मोहिमेचं वाहन येणार असलं की त्याआधी मोटारसायकलवर एक वाहतूक पोलिस विक्रेत्यांना खुणा करीत पुढं पुढं जात असतो. मग ते वाहन आलं की पळापळ वगैरे. स्मार्ट सिटीत असला प्रकार नसेल.
नेदरलँडमधल्या अँमस्टरडॅम या स्मार्टसिटीत तर चक्क इको फ्रेंडली खाऊगल्ली आणि विविध वस्तूंच्या विक्रेत्यांच्याच रस्त्याचेच नियोजन आहे. या रस्त्यावर नेलपॉलिशपासून हेयरपिनांपर्यंत आणि पोशाखापासून शीतपेयांपर्यंत सगळ्या वस्तू मिळतील. त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातला एक रस्ता दिला आहे. लोकांना खरेदीसाठी दूरवर जायला नको म्हणून केलेली खास सोय. या रस्त्यावर येण्यासाठी वाहनांचं पार्किंग आणि संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी केलेली व्यवस्था हा आदर्श नमूना म्हणता येईल. असा रस्ता कशासाठी असा प्रश्न काहींच्या मनात निश्चितपणे येईल. सगळ्यांनाच फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाणं जसं परवडत नाही, तसंच विविध वस्तू खरेदीचंही आहे. अर्थात उच्चभ्रू लोक या रस्त्यावर फारसे दिसणार नाही. या रस्त्याची पर्यावरणपूरक व्यवस्थाही कल्पकतेनं केलेली आहे. सुमारे ३६ दशलक्ष लोकसंख्या असलेल्या जपानमधल्या टोकिओ शहराचं नियंत्रण कसं ठेवलं जातं ते पाहणंही अदभूत ठरू शकतं. जपानी माणूस सुसंस्कृत आणि शिस्तप्रिय आहे. देशाभिमानी आहे. त्याची अनेक उदाहरणं सांगता येतील. स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट नागरिक ही अट आहे, म्हणून हा उल्लेख आवश्यक आहे. अमेरिकेनं अणुबाँब टाकल्यानंतर हिरोशिमा व नागासाकी शहरं राखेतून उभी करणारी जपानी मंडळी़, फुकुशिमा अणुऊर्जा केंद्रावर त्सुनामीचं संकट कोसळलं तेव्हाही हडबडून गेली नाहीत. फुकुशिमाच्या संकटादरम्यान मोठमोठ्या शहरांतील वीजपुरवठा खंडित झाला. त्यावेळी जे जपानी नागरिक दुकानात वस्तू खरेदी करीत होते, ते आपल्या जागी उभे राहिले. हातातील वस्तू रॅकमध्ये जिथल्या तिथं ठेवून टॉर्चच्या प्रकाशात ते बाहेर आले. काही वेळानं वीजपुरवठा सुरू झाला, तेव्हा सर्व वस्तू जिथल्या तिथं होत्या. एकाही वस्तूची चोरी झालेली नव्हती. तीच गोष्ट त्सुनामीनं बेचिराख झालेल्या फुकुशिमा आणि आपद्ग्रस्त भागातील नागरिकांची. मदतकार्य सुरू झालं तेव्हा वृद्ध आणि महिलांना प्रथम संधी दिली जात असे. अन्नाची पाकिटं वाटली जात, तेव्हा रांगेत शिस्तीनं ते हस्तगत केली जात. पाकिटात गरजेपेक्षा जास्त अन्न असेल तर ते परत केलं जाई. ही नागरिकांची शिस्त महत्त्वाची आहे, स्मार्टसिटीची कल्पना प्रत्यक्षात येण्यासाठी नागरिकांचं सहकार्य महत्त्वाचं आहे. नाहीतर आपल्याकडं रेल्वेच्या फर्स्टक्लासच्या डब्यात मोबाईल फोनवर ओरडून बोलणारे सुशिक्षित आढळतातच ना....

नागरिकांकडून केलं जाणारं व्यवस्थापन
स्मार्टसिटीची सर्वात महत्त्वाची कल्पना किंवा मूलाधार असं ज्याला म्हणता येईल तो आहे नागरिकांकडून करण्यात आलेलं शहराचं व्यवस्थापन. स्मार्टसिटीची कल्पना भारतात केंद्रसरकार मांडत असलं तरी स्मार्टसिटीत सरकार असेल ते नागरिकांचं. नागरिकच तिथलं व्यवस्थापन करतील. त्यांच्या अडचणींवर ते स्वतःच उपाय शोधतील. त्यासाठीचं नियोजन तेच करतील. भारतात असं होणं नजीकच्या भविष्यात तरी दुरापास्त आहे. आपल्या घरासमोरचा कचरा सरकारी यंत्रणेकडून साफ केला जावा, अशी मानसिकता बदलणारं हे नागरिकांचं व्यवस्थापन असेल. घरात नको असलेल्या वस्तू आपण सरळ खिडकीबाहेर फेकून देतो. लोकनियुक्त सरकार किंवा लोकप्रतिनिधींनी वीज, पाणी, रस्त्यांची व्यवस्था केली पाहिजे, महापालिकेसारख्या आस्थापनांनी सिटीबस, सार्वजनिक बागा, सांस्कृतिक सभागृहे बांधली पाहिजेत या आणि अशा अनेक कल्पना रूढ आहेत. स्मार्टसिटीत हे सगळं नागरिकांच्या कल्पनेतून साकारलं जावं, अशी अपेक्षा आहे. त्यामुळं इथली अर्थव्यवस्था, कर, जकात वगैरे नागरिक ठरवतील, आणि भरतीलही. अगदी थोडक्यात सांगायचं तर स्मार्ट अर्थव्यवस्था , स्मार्ट प्रशासन, स्मार्ट पर्यावरण, स्मार्ट मोबिलिटी, स्मार्ट जीवनमान आणि सरतेशेवटी स्मार्ट नागरिक अशी ही व्यवस्था आहे. परदेशातल्या गमतीजमती सांगताना तिथल्या नागरिकांच्या प्रामाणिकपणाबद्दल टिप्पणी असतेच. म्हणजे, रस्त्याच्या कडेला वर्तमानपत्रांचे गठ्ठे असतात, नागरिक त्यांना हवं ते वर्तमानपत्र घेतात आणि तिथल्या बॉक्समध्ये पैसे ठेवून जातात वगैरे.
स्मार्टसिटीतलं प्रशासन किंवा व्यवहार असेच असतील. फक्त ते प्रत्येकानं व्यक्तिगत पातळीवर करावेत. आपल्याकडं एटीएमची सुविधा निघाली आहे. लोक स्वतःचे पैसे स्वतः काढायला शिकले आहेत. मोबाईलचा वापर अडाणी शेतकऱ्यापासून उच्चशिक्षितांपर्यंत सगळेच करायला लागले आहेत. स्मार्टफोन वापरायला लागले आहेत. त्यावरून खरेदी विक्री केली जात आहे. रेल्वेच्या तिकिटासाठी रांगेत उभं राहण्याऐवजी आपण इंटरनेटवरून तिकिटं खरेदी करायला लागलो आहोत. स्मार्टसिटीत अशीच व्यवस्था सगळ्याबाबतीत असेल. लोकांना पैसे घेऊन व्यवहार करण्याची गरज नसेल, फक्त संबंधित कार्डची आवश्यकता असेल. आपल्याकडं अनेक पेट्रोलपंपावरही कार्डची सुविधा आहे. मॉलमध्ये तर असतेच. क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड आणि तसली अनेक कार्ड्स असतील. लोकांना हाताळायला सोईची यंत्रणा जागोजाग असेल. त्यामुळं वेळ वाचेल, खर्चही नेमका होईल. बाजारात भाजी आणायला गेल्यानंतर आपल्याकडं घासाघीस होते, तशी घासाघीस करावी लागणार नाही. त्यामुळं शेतकऱ्याच्या मालाला योग्य दाम आणि ग्राहकाला मोजलेल्या दामाचा पुरेपूर फायदा मिळू शकतो. स्मार्ट इमारती, वाहतूक, गटारी, जलवाहिन्या, पथदिवे, घरं, सुरक्षा व्यवस्था, एक ना दोन अनेक गोष्टी स्मार्ट नागरिक आपापल्या पद्धतीनं हाताळतील. त्यात काही त्रुटी असतील तर त्यात दुरूस्त्याही त्यांचे ते करतील. घराघरात गॅस सिलिंडरद्वारे इंधन पुरवठ्याऐवजी पाईपलाईन असू शकेल. महापालिका किंवा जिल्हा परिषदेसारख्या आस्थापनांमध्ये विविध दाखल्यांसाठी हेलपाटे घालावे लागणार नाहीत, कारण ते आँनलाईन मिळण्याची सोय असेल. दवाखाने, शाळा, शाळां-कॉलेजांमधील अभ्यासक्रम, शिक्षणानंतर नोकऱ्या, उद्योग, कारखाने अशा सगळ्यावर नागरिकांचं नियंत्रण असेल. त्याचे फायदे आहेत, तसे तोटेही आहेत. अनेकांच्या हाती व्यवस्थापन गेले तर कोणीच कोणाला बांधील नसेल. एक प्रकारचा गोंधळ निर्माण होईल. मात्र त्यावर तोडगाही काढता येऊ शकेल, यात शंका नाही.
गुन्ह्यांवर नियंत्रण
मानवी स्वभाव, त्याच्या गरजा आणि सवयी-मानसिकता यातून सगळं आलबेल असेल, असं म्हणणं धाडसाचंच ठरेल. ज्या समाजात विद्वान, प्रतिभावान माणसं निपजतात, त्यातूनच गुंड-मवाली आणि गुन्हेगार जन्माला येतात. म्हणून खलील जिब्रानसारखा प्रज्ञावंत म्हणतो - एखादा गुन्हेगार त्यानं केलेल्या गुन्ह्याबद्दल जेवढा दोषी असतो, तेवढाच दोषी त्याच्या भोवतालचा समाजही असतो. कारण त्यानंच त्याला असा गुन्हा करण्यासाठी कळतनकळत प्रवृत्त केलेलं असतं. म्हणून एखाद्या अपराध्याला शिक्षा देताना, त्यानं तसं का केलं, कुणामुळं केलं याकडंही पाहणं आवश्यक असतं.
जिब्रान जे सांगतो, ते स्मार्टसिटीत तपासून पाहता येणं शक्य आहे. इथला सगळा जीवन व्यवहार सुनियंत्रित असेल. तरीही गुन्हे होणारच, अपघात होणार. माणसांचं वर्तन, मानसिकता नियंत्रित करणारी स्मार्टसिटी कालत्रयी शक्य नाही. माणूस दुसऱ्या क्षणाला कसा वागेल, ते सांगणं कठीण आहे. अन्य प्राणी आणि माणसांमध्ये हाच मूलभूत फरक आहे. म्हणूनच गुन्हेगारांवर नियंत्रण ठेवणं हे स्मार्टसिटीतलं आव्हान अधिक जटिल आहे.
शहरातील सगळ्या महत्त्वाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले जातील. बँक, एटीएम, इमारतींचं आवार, कार्यालये आणि गुन्हा घडण्याची शक्यता असलेली अन्य सार्वजनिक ठिकाणं कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली असतील. गरजेनुसार अलार्म सिस्टिम असेल. पॅरिसमध्ये फेस आयडेंटिफिकेशन सिस्टिम लागू केली आहे. आपल्याकडं आधारकार्डासाठी किंवा दस्तांच्या अधिकृत नोंदीसाठी बोटांचे ठसे, फोटो काढण्याची पद्धत सुरू झाली आहे. पॅरिसमध्ये जन्माला आलेल्या प्रत्येकाची अशी नोंद होते. आपल्याकडं पूर्वी प्रत्येक पोलिस ठाण्यात संशयित आरोपी किंवा गुन्हेगारांचे फोटो गळ्यात पाटी अडकवून त्याच्या नावासह डकवलेले असत. पॅरिसमध्ये संबंधित गुन्हेगारांची माहिती त्याचा डीएनए, फोटोसह संगणकावर असते. त्यामुळं गुन्ह्यांवर मर्यादा घालणे किंवा आरोपीला पकडणे सोयीचं होतं. अनेक ठिकाणी असे गुन्हेगार गुन्ह्यासाठी गेले की तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यावर त्यांचा चेहरा स्कॅन होतो, तसा अलार्म जवळच्या पोलिस ठाण्यात वाजतो. सुरक्षेची ही स्मार्ट पद्धत तिथे उपयुक्त ठरली आहे. मुंबई-दिल्लीसारख्या महानगरांमध्ये घरात कामाला विश्वासू माणसं मिळणं कठीण असतं. अशा पद्धतीचं स्कॅनिंग करून त्यांची माहिती ठेवणाऱ्या संस्थांना पुढच्या काळात चांगली संधी आहे. ही झाली प्राथमिक माहिती. आधुनिक तंत्राचा वापर करून गुन्हेगारी आटोक्यात ठेवण्यासाठी स्मार्टसिटीत महत्त्वपूर्ण सुविधा असतील.
शिक्षणाच्यासंदर्भातील नियोजन केल्यानंतर संबंधित उमेदवारांना, तरुणांना नोकरीचे नियोजनही या शहरांमध्ये केलेले असेल. उमेदवाराने घेतलेल्या शिक्षणानुसार त्याला कुठं नोकरी मिळू शकेल, याची माहिती एका डाटाबेसद्वारे तयार केली जाईल. इतकंच नव्हे तर शहराची गरज काय आहे, हे ध्यानात घेऊन त्या पद्धतीचं शिक्षण आणि नोकऱ्या उपलब्ध करून देण्याची योजना भविष्यात असेल. घरातील गळणारे नळ, गल्लीत तुडुंब भरून फुटलेल्या गटारी आणि वाहतं पाणी हे चित्र जसं इथं दिसणार नाही, तसंच रोजगारासाठी आंदोलन करणारी तरूणाई या शहरात नसेल. शहरातील नागरिकांचं, त्यांच्या कुटुंबांचं, त्यांच्या उपजीविकेच्या साधनांचं नियोजन शहरावर नियंत्रण ठेवणाऱ्या यंत्रणेकडून ठेवलं जाईल. विशेष म्हणजे, या शहरांमध्ये पुढच्या किमान पंचवीस वर्षांत कोणता बदल होईल, लोकसंख्या किती प्रमाणात वाढेल, त्यादृष्टीने कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत, याचाही विचार केलेला असेल. त्यामुळे बदलतं वाढीव आणि विकसित इन्फ्रास्ट्रक्चर नियोजनात असेलच. शहराचा अर्थसंकल्प मांडताना संबंधित आस्थापनाप्रमुख याचा विचार करतीलच. स्मार्टसिटी हे स्वतंत्र बेट नसेल तर ती शहरात शिस्तीनं राहण्यासाठी केलेली उत्तम जीवनप्रणाली असेल. अशा प्रणालीत कदाचित जातीयवादाला थारा नसेल. उच्च-नीच भेद नसेल. माणसं माणसाच्या अधिक जवळ येतील. मोर्चे, आंदोलन किंवा हिंसाचार कमी असेल. प्रत्येक नागरिकाला आपलं काय काम आहे, ते निश्चित ठाऊक असल्यानं गोंधळ होणार नाही.
पाण्याचा वापर आणि पुनर्वापर ही अत्यावश्यक गोष्ट स्मार्ट सिटीत सहजतेनं केलेली असेल. पाण्याची गळती, चोरी आणि वितरण व्यवस्था नेमकी व नेटकी करण्याचं आव्हान अशा शहरात पेललेलं असेल. सिंगापूर हे यासाठी आदर्श उदाहरण आहे आणि इस्त्राईल हा पाण्याचा हिशेब ठेवणारं राज्य हा नमूना असेल. इस्त्राईलमध्ये जेमतेम १२५ मिलीमीटर पावसावर पिकं घेतली जातात. प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं जातं. कोंबडीपालनापासून शेळी, वराह पालनापर्यंत सगळे उद्योग केले जातात, त्यासाठी पाणी किती लागेल याचा विचार केला जातो. अगदी अंडी विक्री करायची असेल तरी लागणाऱ्या पाण्याचा हिशेब होतो. कोंबडी खाद्य कोणतं खाते, ते खाद्य तयार करायला किती पाणी लागेल, कोंबडी किती पाणी प्राशन करेल, ही अंडी संबंधित पोल्ट्रीतून शहरात आणली जातील, त्यासाठी किती पाणी लागेल – म्हणजे त्या वाहनाचं इंधन, त्यासाठी लागलेली ऊर्जा, त्यासाठी लागलेलं पाणी या सगळ्याचा विचार बारकाईनं करणारं इस्त्राईल पाणी वापराचा आदर्श नमूना आहे. तसाच विचार आपण केला तर पुढच्या काळात परिस्थिती आपल्या हातात राहिल. अन्यथा साखरेसाठी किती पाणी लागतं, ते शेतापर्यंत नेण्यासाठी किती ऊर्जा लागते- तिच्या निर्माणासाठी किती पाणी लागतं याचा हिशेब केला तर साखरेची किंमत किती होईल, याचा अंदाज केलेला बरा. शहरात पिण्यासाठी पाणी किती लागणार आहे, याचा हिशेब करून त्याचा पुरवठा केला जाईल. त्यासाठी संगणकीय प्रणाली वापरली जाईल. पंधरा दिवस किंवा आठवड्याभराची कमांड त्याला दिली जाईल. त्यानुसार पाणी पुरवले जाईल. एखाद्या कुटुंबाला किंवा समुहाला अधिक पाण्याची गरज असल्यास त्यांनी तशी नोंद आधीच करणे अपेक्षित आहे.
सिंगापूरमध्ये कचरा पेटीत जमा होणाऱ्या कचऱ्यावरही नियंत्रण ठेवलं जातं. त्यासाठी जीपीएस प्रणाली वापरली जाते. धोकादायक कचरा वेगळा, प्लास्टिक कचरा, ओला कचरा, मेडिकल वेस्ट, इलेक्ट्रॉनिक कचरा अशांसाठी गरजेनुसार डंपिंग यार्ड किंवा प्रोसेसिंग युनिट उभे केले जाईल. बेंगळूरू ही आपल्याकडची उद्याननगरी आहे. म्हणजे या शहरात खूप उद्याने आहेत. पण स्मार्टसिटीच्या नव्या रचनेत शहरात उद्याने बांधली जाणार नसून उद्यानांमध्ये शहर वसवले जाणार आहे. प्रत्येक टप्प्यावर पर्यावरणाचा विचार केला जाईल, त्यामुळे नो कार्बनसिटी म्हणूनही तिची ओळख होईल. सगळी व्यवस्था तंत्रज्ञानावर आधारित असल्याने अखंड वीजपुरवठा आवश्यकच आहे. त्यासाठी शहराच्या मालकीची ऊर्जा निर्मिती केंद्रं असतील. शिवाय नागरिकांना पवन ऊर्जा, सौर ऊर्जा तयार करण्यासाठी प्रोत्साहन दिलं जाईल. सार्वजनिक स्वच्छतागृहांची सोयही नेमक्या ठिकाणी केलेली असेल. या शहरांचं नियोजन, डिझाईन, व्यवस्थेची अंमलबजावणी आणि प्रत्यक्ष कार्यवाही करणारी यंत्रणा यांचं संतुलन महत्त्वाचं आहे. एकीकडं सुखकारक, आरोग्यदायी जगणं बहाल होत असताना बदलत्या, वेगवान तंत्रज्ञानाचा उपयोग करणंही गरजेचं आहे. त्यामुळं त्याच्याशी जुळवून घेण्याचं आव्हान इथल्या नागरिकांपुढं असेल.
महाराष्ट्रात लवासा हे असं हिलस्टेशन किंवा स्मार्टसिटी म्हणून विकसित होत असलेलं उदाहरण सांगता येईल. स्वातंत्र्यानंतर भारतात विकसित होणारं हे स्मार्ट शहर सात डोंगरांमध्ये वसवलं जात आहे. या शहरातील ६० किलोमीटरचा परिसर तलावाभोवती असेल. २५ हजार एकर इतकं त्याचं क्षेत्रफळ आहे. शिक्षण, आरोग्य, उद्योग आणि रहिवास या सर्वच पातळ्यांवर त्याचा विचार केला गेला आहे. उत्कृष्ट पर्यटन केंद्र म्हणून ते विकसित केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञानात हे शहर अग्रेसर असेल. इथे बायोटेक्नॉलॉजी इंडस्ट्री उभी राहत आहे. कला, फॅशन आणि नवनव्या शोधांचं हे माहेरघर ठरावं, अशी बांधणी येथे केली जात आहे. साधारणपणे तीनेक लाख लोक कायम आणि वार्षिक वीस लाख पर्यटकांना गृहित धरून लवासा शहर विकसित होत आहे. ब्रिटिशांनी सिमल्यासह अनेक हिलस्टेशन्स उभी केली. त्यांच्या दूरदृष्टीचं, गुणवत्तेचे गोडवे आजही गायले जातात. लवासा हे असेच शहर असेल. एखादं खेडं विकसित होऊन त्याचं शहर होतं. शहराचं महानगर होतं. महानगर नियंत्रण घालवून बसलं की त्याचं प्राचीन, पुरातत्व शहरात रूपांतर होतं. ते एकेकाळची संस्कृती सांगणारं मोहंजोदडो-हडाप्पासारखं शहरं होऊन बसतं.
महानगरांची स्थिती व गती
दिल्लीसारख्या शहराची स्थिती आपल्याला ठाऊक आहे. नवी दिल्ली वसवली. पण तीही कमी पडत आहे. आता जागतिक पर्यटन केंद्र म्हणून नावारूपाला आलेल्या आग्रा शहराला स्मार्टसिटीमध्ये रूपांतरित करता येऊ शकतं का, याचा अदमास घेतला जात आहे. दूरसंचार, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग, माध्यमसेवा, हॉटेल्स, पर्यटन स्थळ अशा सर्वांगानं हे शहर दिल्लीजवळ विकसित झालं तर देशासाठी ती गौरवशाली बाब असेल. बॉलीवूडनगरी आणि देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नव्या मुंबईत स्मार्ट सिटीची अनेक वैशिष्ट्य आहेत. तिथला विमानतळ अत्यंत विलोभनीय आहे. स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँक आणि अन्य अनेक महत्त्वाच्या आस्थापनांमुळं मुंबईनगरी जगविख्यात आहे. तिचा ताण कमी करण्यासाठी नव्या मुंबईच्या पुढं पनवेल-पेण परिसरात नवी वसाहत स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभी करता येईल का, याचा विचार केला जात आहे. विद्येचं माहेरघर अशी ओळख असलेल्या पुण्यात सॉफ्टवेअर इंडस्ट्री विकसित झाली आहे. टाटा, इन्फोसी आणि अन्य मोठ्या संस्था-कंपन्यांनी पुण्याचा चेहरामोहरा बदलला आहे. तर आटोमोबाईल आणि हेल्थ हब म्हणून चेन्नई ओळखली जाते. पूर्व भारताचे आर्थिक केंद्र म्हणून कोलकात्याचा परिचय जगाला होत आहे. इथलं सॉल्ट लेक स्टेडिअम भव्य आहे. कम्युनिस्टांच्या राजवटीनं हे शहर स्वतंत्र भारतातही मागं पडलं आहे. कोणत्याही प्रकारचं नियोजन नसलेल्या या शहराला आता स्मार्ट सिटीत रूपांतरित करणं आव्हानात्मक आहे. मात्र त्याच्या जवळ स्मार्ट शहर वसवून त्यावरचा भार कमी करणं गरजेचं आहे. सॉफ्टवेअर, दूरसंचार आणि अंतराळविषय संशोधनासाठी बेंगलूरू प्रसिद्ध होत आहे. स्मार्ट सिटीचे अनेक गुण त्यात आहेत. आंध्रप्रदेश आणि तेलंगणात राहणाऱ्यांसाठी हैदराबाद शहर जेवढं अभिमानाचं आहे तेवढंच ते प्रत्येक भारतीयांसाठी आहे. सिलिकॉन व्हॅली म्हणूनही सिकंदराबादसारख्या उपनगराचा उल्लेख होत असतो.
या शहरांचं रूपांतर पूर्णपणे स्मार्टसिटीत करणं अवघड असलं तरी त्यांच्या जवळपास नवी शहरं वसवून या शहरांवरचा अतिरिक्त भार कमी करायला हवा. नव्यानं विकसित करणं शक्य असणारी शहरं सॅटेलाईट टाऊन्स म्हणून ओळखली जावीत. कारण तिथला सगळा व्यवहार नियंत्रणाखाली असतो. दिल्लीजवळ रोहिणी, द्वारका आणि नरेला, नवी मुंबई, कोलकात्याजवळ सॉल्ट लेक सिटी, बेंगळूरूजवळ येलहांका व केंगरी, याशिवाय नोएडा, ग्रेटर नोएडा, मानेसर, पिंपरी-चिंचवड, राजराहट, डंकूनी ही शहरे स्मार्टसिटीत बदलता येतील. विशाखापट्टणम, भिलाई, बोकारो, रूर्केला या प्रगत औद्योगिक वसाहती आहेत. जमशेदपूरची टाटा स्टील कंपनी प्रचंड मोठी आहे. या कंपनीनं या शहराला ओळख आणि जीवन दिलं आहे. तिथल्या माणसांना मिळणाऱ्या रोजगारात या कंपनीचं योगदान मोठं आहे. अशा कंपन्यांनी विकसित केलेल्या शहरांबरोबरच प्रायव्हेट किंवा खासगी शहरांचा विचारही देशात केला जात आहे. दिल्लीत डीएलएफ किंवा मुंबईतील हिरानंदानी ही त्याची उदाहरणं ठरू शकतात. रस्ते-वीज-पाण्यासारख्या सगळ्या गरजेच्या गोष्टींचं नियंत्रण या विकसकांनीच ठेवलं आहे. मीठापूर, मोदीनगरांमध्येही हे चित्र आढळतं.
पुणे-मुंबई-अहमदाबाद कॉरिडॉरचं काम सुरू आहे. त्यामुळं तिथल्या औद्योगिक वसाहतींबरोबरच नागरी वसाहतीही अद्ययावत असतील. रेल्वे, विमान, जल आणि रस्ते वाहतुकीनं हा कॉरिडॉर उत्तमरीतीनं जोडला आहे. त्यामुळं एकाचवेळी व्यक्तिगत आणि दुसरीकडं जागतिक पातळीवर तो आकर्षणाचं केंद्र झाला आहे. बेंगळूरू, हैदराबाद, चेन्नईसारख्या शहरांशी तो हायस्पीड रेल्वेनं जोडला जाणार आहे. तसाच तो अहमदाबाद आणि दिल्लीशीही जोडला जाईल. दिल्लीपासून अमृतसर, लुधियाना-चंडिगढ अशीही रचना होऊ शकते. विद्यमान महानगरांमधील मोठी लोकसंख्या इकडे वळवता येऊ शकते. कोणत्याही गरजेसाठी अशा स्मार्टसिटीतील नागरिकांना बाहेर जाण्याची वेळ येणार नाही, इतकी समृद्धी तिथं असेल. उत्तम इन्फ्रास्ट्रक्चर, पूर आणि अन्य आपत्ती व्यवस्थापन, पाणीपुरवठा, घनकचऱ्याचे नियोजन, दर्जेदार वाहतूक व्यवस्था, ऊर्जाव्यवस्था (वीजपुरवठा) या सर्वाचा बारकाईनं विचार करून स्मार्टसिटी अस्तित्वात येतील. पुढच्या शंभर वर्षांचा विकासाचा दृष्टिकोन त्यात अनुस्युत असेल तर गडबड गोंधळाचे कारण नसेल. कमीत कमी प्रदूषण, २४ तास पाणी व वीजपुरवठा, त्यांच्या पुनर्वापराचे तंत्र, ऊर्जेचा पूरेपूर उपयोग, उत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था हे नव्या शहरांचे मानदंड असतील. दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये याचा विचार झाला आहे. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, राजस्थान, हरियाना, गुजरात, मध्यप्रदेश या राज्यांमधील काही भागांचा विकास यातून होऊ शकतो. स्मार्ट सिटी कोची, हल्डिया, गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक्निकल सिटी म्हणजेज गिफ्ट ही शहरं प्रायोगिक तत्वावर विकसित होत आहेत. लंडन, पॅरिस, सिंगापूर, शांघाय, टोकियो, शिंजुकु ही शहरं भारतातच असल्याचं चित्र आगामी काळात दिसलं तर सगळ्यांना आवडेलच.
नागरिकांची मानसिकता महत्त्वाची
कोणत्याही शहराचा विकास माणसांच्या मनोवृत्तीवर अवलंबून असतो. स्मार्टसिटीची कितीही भव्य कल्पना राबवली तरी तिथं राहणाऱ्या माणसांनी ती अंमलात आणली पाहिजे. भारतीय मानसिकता अजून विकसित व्हायची आहे हे खरंय. कारण लोकांना नोकऱ्या पाहिजेत, शेताला पाणी पाहिजे, घरात विजेचे दिवे हवेत, पण त्याची किंमत द्यायची तयारी नाही. सरदार सरोवर, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प किंवा तशा पद्धतीची कोणतीही आंदोलनं आपली मानसिकता स्पष्ट करण्यासाठी पुरेशी आहेत. ऊर्जाप्रकल्पांना विरोध करणाऱ्या तथाकथित पर्यावरणवाद्यांना त्यांच्या घरातील वीज काही काळासाठी खंडित झालेली अजिबात आवडत नाही. असे विरोधाभास खूप सांगता येतील. थोडक्यात सांगायचं तर विकासासाठी, स्मार्ट सिटीसाठी नागरिकांची मानसिकताही तयार होणं आवश्यक आहे. त्याची जबाबदारी प्रत्येकानं आपापल्या परीनं उचलली पाहिजे, इतकंच.