बुधवार, ३० मे, २०१८


नळदूर्गच्या "आपलं घर'ने दिला अनाथांना आधार !

उस्मानाबाद जिल्ह्यातल्या नळदूर्गजवळ असलेल्या "आपलं घर' संस्थेची उभारणी केली आहे राष्ट्र सेवा दलाने. 1993 साली किल्लारी आणि परिसरात भूकंप झाला. त्यात हजारो लोक मरण पावले. घरादाराची राख रांगोळी झाली. माणसं जीवानिशी गेली, मागं उरलेल्यांचं काय? "जगाला प्रेम अर्पावे' या प्रेमभावनेशी कटिबद्ध होऊन राष्ट्रसेवा दलाने त्यांच्यासाठी प्रेमाचा हात पुढे केला. जे या आपत्तीत निवर्तले त्यांच्या अपत्यांना जगवण्यासाठी, वाढवण्यासाठी सुरू झालेल्या नळदूर्गच्या "आपलं घर'मधील लक्ष्मी आज अमेरिकेत आहे तर छाया माने ऑस्ट्रेलियात. या दोघींचे आई-वडील भूकंपात नाहिसे झाले. शामल पोतदार या मुलीचे आईवडीलही भूकंपात गेले, पण माजी पंतप्रधान व्ही. पी. सिंग यांनी तिला शिक्षणासाठी दत्तक घेतले आणि ती पदवीधर होऊन स्वतःच्या पायावर उभी राहिली.

आईवडिलांपासून निराधार झालेल्या मुलांना राष्ट्रसेवा दलानं आत्मीयतेनं आपलंसं केलं. अनाथ आणि उपेक्षित मुलांचं "आपलं घर' आज 240 निराधार मुला-मुलींचा प्रेमानं सांभाळ करीत आहे. भूकंपात अनाथ झालेली मुले आता मोठी झाली आहेत. त्यांच्या पंखांत राष्ट्र सेवादलाने बळ दिले. ही मुले आता आनंदाने स्वतःच्या पायावर उभी आहेत. सन्मानांचं जीवन जगत आहेत. अनेक मुलींचे विवाह झाले आहेत. "आपलं घर' हे त्यांचं माहेर आहे. अनेक मुले आता बिल्डर, शिक्षक, पोलिस, इंजिनियर आणि इतर उद्योगांमध्ये आहेत. आलियाबाद टेकडीवर 24 डिसेंबर 1993 साली सुरू झालेल्या या संस्थेचा आता वटवृक्ष झाला आहे.

"आपलं घर'मध्ये सध्या राहत असलेल्या मुलांसाठी 21 एकर जागेवर वसतिगृह, धरित्री विद्यालय, भोजनगृह, ग्रंथालय, कलासांस्कृतिक सभागृह, विश्रामगृह, विज्ञानशाळा, गो शाळा, प्रशस्त क्रीडांगण आणि झाडांनी डवरलेल्या टेकडीचा समावेश आहे. पहाटे पाच वाजता उठणारी मुले अभ्यास, व्यायाम, समूहगीते आणि सेवादलाची शाखा केल्यावर सकाळी दहा वाजता शाळेत जातात. चार वाजता शाळा सुटते. त्यानंतर संगणक, चित्रकला, शिल्पकला, संगीत, शिलाई, भरतकाम, शेती, विज्ञानशाळा यांचे शिक्षण दिले जाते. "तारे समतेचे' या नावानं "आपलं घर'मधील मुले मनोरंजन आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमही सादर करतात. त्याचा निधी संस्थेसाठी वापरला जातो. "गलत मत कदम उठाओ, राह की मुसीबतोंको पार कर चलो', या रक्ताला या मातीचा मृत्युंजय अभिमान, अमुचा देश महान', "चलो बसाये नया नगर अब,' ही आणि अशा अनेक गाण्याचा दोन तासांचा कार्यक्रम "नाचू गाऊ समतेची गाणी' या नावानं ही मुले सादर करतात.

विशेष म्हणजे, नळदूर्ग आणि आसपासचा परिसर पूर्णपणे अंधारात असताना "आपलं घर' मात्र सौर दिव्यांनी उजळलेलं असतं. रात्रीचा अभ्यास सौर दिव्यांखाली होतो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची येथे नियमित तपासणी होते. आहारामध्ये वैद्यकीय निकषाप्रमाणे भोजन दिले जाते. मुलांना दूध मिळावे म्हणून गोशाळा कार्यरत आहे.

"आपलं घर'चे कार्याध्यक्ष दत्ता गायकवाड म्हणाले, ""मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी इथे प्रयत्न केला जातो. अनेक बिकट प्रसंगांना तोंड देत संस्थेची वाटचाल सुरू आहे. पण या सगळ्यात समाधान आहे की मुलांचे भविष्य उज्ज्वल आहे. 2 डिसेंबरला पुण्यात "आपलं घर'मधील मुलांचा मेळावा झाला. ही मुले आता आर्किटेक्‍ट, बिल्डर आणि मोठमोठ्या कंपन्यात काम करतायत. त्यांनी प्रतिवर्षी किमान एक हजार रूपये संस्थेला पाठवू असं सांगितलं. शाळेबद्दल त्यांच्या मनात अपार कृतज्ञता आहे. पुण्यात बिल्डर झालेल्या बालाजी शिंदे या तरूणाने तर कोणतीही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्‍वासन दिलं. या सगळ्यांच्या आश्‍वासनांपेक्षा ही मुले उभी राहिली याचं समाधान मोठं आहे.''

काही विचित्र अनुभवातून पुढं आलेली मुले खरोखर विलक्षण म्हणावी लागतील. एका गुन्ह्यात अमोल गायकवाडच्या वडिलांना जन्मठेप झाली. त्याचा सांभाळ करायला कुणी तयार नव्हतं. तो "आपलं घर'मध्ये दाखल झाला. आता तो एम.टेक झालाय. अनिल जांघे हा मुंबईच्या खास कमांडो पथकात आहे. राजश्री अरूण गोसावी ही मुलगी उत्तर फंड योजनेतून दहावी झाली. ती पुण्यात स्थायिक झाली आहे, असं संस्थेचे सचिव शिवाजी पोतदार यांनी सांगितले. दहावी उत्तरफंड ही योजना उच्च शिक्षणासाठी राबवली जाते. सध्या या योजनेतून 30 मुले विविध शहरांमधील महाविद्यालयांमधून उच्चशिक्षण घेत आहेत. या निधीसाठी समितीतर्फे सतत देणग्या मिळवणे, मुलांशी संपर्कात राहून त्यांच्या शैक्षणिक प्रगतीचा अहवाल घेणे, अडचणी सोडवणे अशी कामे केली जातात. कलावती राठोड, लांडे अशी अनेक मुले या योजनेतून पुढे आली. विभाकर सुलाखे, अप्पासाहेब बेंबळकर ही मान्यवर मंडळी त्यासाठी मार्गदर्शन करीत असतात.

शिवाजी पोतदार हे नुसते सचिव नाहीत. 21 एकर क्षेत्रावर पसरलेल्या आपलं घरच्या शाळा आणि वसतिगृहातील घडामोडींवर त्यांचं बारीक लक्ष असतं. ते स्वतः उत्तम व्हायोलिन वादक आहेत. "आपलं घर'च्या कलापथकात गाणी म्हणण्यापासून वादनापर्यंत सगळ्यात त्यांचा सहभाग असतो. संस्थेत दाखल झालेल्या काही अनाथ मुलांचे इतर नातेवाईक त्यांच्या नावाने असलेल्या इस्टेटीच्या कारणामुळे टपलेली असतात. या मुलांच्या जीवालाच धोका निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही, ही मुले कुठे जातात, काय करतात यावर लक्ष ठेवून त्यांना अपाय करण्याच्या घटना घडल्या आहेत. पण त्यावर मात करण्यात यश मिळाले आहे. वयात येणाऱ्या मुलींकडं कुणी वाकड्या नजरेनं पाहत नाही ना, अशा अनेक गोष्टींकडं शिवाजींचं डोळ्यात तेल घालून लक्ष असतं.

या परिसरातील डोंगरावरील दहा एकराचे क्षेत्र संस्थेला मिळाले आहे. त्यावर 3000 झाडे लावण्यात आली आहेत. उघडे डोंगर ही नळदूर्ग भागाची खासियत आहे. हिरवाईनं नटलेले आणि वृक्षराजीनं गजबजलेले डोंगर पाण्यानं भरलेल्या ढगांना थांबवू शकतात. या भागातील पावसाच्या प्रमाणात त्यामुळं वाढ होऊ शकते. झाडं जगावीत म्हणून प्रत्येक मुलाला तीन झाडं दत्तक दिली आहेत. 2000 साली या ठिकाणी फक्त एक झाड होतं. आता हा परिसर दाट झाडांनी गजबजला आहे. गोशाळेत गायी आहेत. काही क्षेत्रावर वसतिगृहातील मुलांसाठी भाजीपाला लावला आहे. खर्चात बचत व्हायला त्यामुळे मदत होते. रोज लागणारी भाजी आपल्याच शेतात पिकवल्याने त्याचा फायदा होतो. मुलांना ताजी भाजी मिळते आणि वसतिगृहातील भोजनशाळेची सोय होते. हे भाजीचे वाफे मुले-मुली सांभाळतात. त्यांच्याकडे लक्ष देतात. हे एकप्रकारचे कृषीशिक्षणच आहे. 17 गृहमाता, वॉचमन, क्‍लार्क असा 30 जणांचा स्टाफ आहे. दर शनिवारी डॉक्‍टर तपासणी करतात. नर्स निवासी आहेत.

विविध उपक्रम
संगणक विभागात "एमएससीआयटी' परीक्षेसाठी 45 विद्यार्थी आहेत. ऑफिस ऑटोमेशन, डी.टी.पी., टॅली, डिजिटल फोटोग्राफीचे शिक्षण येथे दिले जाते. मूळचे कोल्हापूरचे असलेले जावेद नदाफ येथे निवासी शिक्षक आहेत. या विभागात मुलांना प्रामुख्याने डीटीपीचे शिक्षण दिले जाते. त्यामुळे भविष्यात कुठेही डीटीपी ऑपरेटर म्हणून त्यांना नोकरी मिळू शकते. किंवा पुढील शिक्षण घेताना या नोकरीचा हातभार स्वावलंबी होण्यासाठी लागू शकतो. इंग्रजी आणि मराठी ऑपरेटिंगमध्ये मुले-मुली पारंगत होत आहेत.
कोकणातून आलेल्या विजयाबाई बिवलकर गंगाबाई साबद्रा कक्षात शिलाई प्रशिक्षण देतात. शाळेच्या मुला-ंमुलींचे गणवेश इथेच शिवले जातात. विजयाबाई जरी कोकणातून आल्या असल्या तरी आता त्या पक्‍क्‍या मराठवाडी झाल्या आहेत. या शाळेत त्या रमल्या आहेत. एम्ब्रॉयडरी, कशिदाकाम त्यांना शिकवले जाते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे, शाळेतील सगळ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना जो गणवेश आहे, त्याचे माप घेऊन या प्रशिक्षण कक्षात ते शिवले जातात. आपणच शिवलेला गणवेश घालताना या मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद दिसतो, तो अवर्णनीय असतो, असे श्री. पोतदार सांगतात.

चंदूलाल गांधी संगीत कक्षात तबला, हार्मोनियम आणि गाण्याचे प्रशिक्षण दिले जाते. श्रीराम पोतदार, रूपाली, खंडू मुळे ही इथली प्रशिक्षक मंडळी. या संगीत प्रशिक्षणाचाच भाग म्हणून "नाचू गाऊ समतेची गाणी' हा कार्यक्रम तयार झाला आहे. या कार्यक्रमातून मुलांनी संस्थेसाठी पाच लाखांपेक्षा जास्त निधी जमवला आहे.
बाबासाहेब परांजपे लोकवाचनालय इथे आहे. अडीच हजार पुस्तकांचा संग्रह त्यात आहे. ग्रंथालयाबरोबरच वेगवेगळी वर्तमानपत्रेही मुलांना इथे वाचायला मिळतात.
डॉ. शरद पिशवीकर विज्ञान शाळेतून वैज्ञानिक उपकरणांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. प्रसिद्ध संगणक तज्ज्ञ अच्युत गोडबोले यांच्या हस्ते या विभागाचे उद्‌घाटन करण्यात आले आहे. आकाशदर्शन, शेती, आरोग्य, पर्यावरण कार्यशाळा इथे होतात. बळीराम जेठे त्याचं काम पाहतात. विद्यार्थ्यांना शेतीबरोबरच विज्ञानविषयक माहिती व्हावी, हा विज्ञान शाळेचा हेतू आहे. याशिवाय ज्ञानदीप बालक मंदिर, धरित्री प्राथमिक व माध्यमिक विद्यालय चालवले जाते. वसतिगृहात मुला-मुलींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वतंत्र भोजनकक्ष आणि शुद्ध पिण्याच्या पाण्याची यंत्रणा याठिकाणी आहे. चित्रकला, शिल्पकला, भाऊसाहेब रानडे कला क्रीडा केंद्र इथे आहे. भाऊसाहेब रानडे हे राष्ट्रसेवा दलाचे पितामह मानले जातात. त्यांनी सेवादलाच्या तरूणांना शरीरसौष्ठवाचे धडे दिले. त्यांच्या प्रयत्नाने राष्ट्र सेवादलाच्या काही पिढ्या समताधिष्ठित समाजनीतीसाठी झटत आहेत. त्यांनी कलापथकासाठीही परिश्रम घेतले होते. "आपलं घर'मध्ये भाऊसाहेब रानडे यांच्या नावाने एक व्यायामशाळाही उघडण्यात आली आहे. मराठवाड्याच्या विविधतेचे दर्शन घडवण्यासाठी एक कलादालन इथे उघडले आहे.

"आपलं घर'चं एक वैशिष्ट्य म्हणजे इथे वेगवेगळी शिबिरे होत असतात. राष्ट्रसेवादलाची श्रमसंस्कार शिबिरे इथे झाली आहेत. डॉ. राममनोहर लोहिया यांच्या जन्मशताब्दीचा मोठा कार्यक्रम इथे झाला. रावसाहेब पटवर्धन हायस्कूल, पुणे, कोल्हापूर, निगवे खालसा, उदगीर व उस्मानाबाद येथील तरूण-तरूणींनी त्यात सहभाग नोंदवला. पाणी अडवा, पाणी जिरवा, झाडांचे खड्डे खणणे, बंधारे बांधणे अशी कामे या शिबिरांमधून झाली. रचनात्मक संघर्ष समिती, लोकप्रबोधन मंच, वर्ल्ड व्हिजन, सर्व शिक्षा अभियान, अभिव्यक्ती आणि छात्रभारती या समविचारी संघटनांची शिबिरे इथे होतात. त्याचा विद्यार्थ्यांनाही लाभ होतो.

मान्यवरांच्या भेटी
राष्ट्रसेवा दलाचाच हा उपक्रम असल्याने भाई वैद्य, पन्नालाल सुराणा, निळू फुले, मेधा पाटकर, अण्णा हजारे, सुशीलकुमार शिंदे, बाबा आढाव, . प्र. प्रधान अशा अनेक मान्यवरांनी इथे भेटी दिल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा