पुनमचंद बिश्नोई
सलमान खानने गोळ्या घालून मारलेल्या काळविटामध्ये पुनमचंद बिश्नोईंनाच नव्हे; तर तमाम बिश्नोई समाजालाच त्यांचे गुरू जांभेश्वर यांचे प्रतिरूप दिसले. कारण 1451 साली बिश्नोई पंथाची स्थापना करणाऱ्या या गुरूंनी देह ठेवताना आपल्या शिष्यवर्गाला सांगितले होते, ""मी पुन्हा जन्माला येईन तो काळवीट होऊन.'' पुनमचंद या जोधपूरजवळच्या कंकानी गावात राहणाऱ्या बिश्नोईला ही गोष्ट जन्मजात ठाऊक होतीच. साहजिकच, 1998 साली सलमानने आपल्या सहकारी कलावंतांसमवेत केलेल्या काळविटाच्या शिकारीच्या गुन्ह्यात त्याला शिक्षा होण्यासाठी पुनमचंद आणि संपूर्ण बिश्नोई समाजाने कंबर कसली. परिणामी सलमानला पाच वर्षांची शिक्षा झाली.
पुनमचंद त्यामुळे आज प्रसिद्धीच्या शिखरावर आहेत. "प्राणीमात्रावर दया करा',"वृक्षतोड करू नका' हा संदेश पंधराव्या शतकात गुरू जांभेश्वरांनी देऊन ठेवला आहे. पुनमचंदांनी सलमानच्या "दबंग'गिरीला न घाबरता शेवटपर्यंत लढा दिला. त्यांच्यापुढे आदर्श होता तो त्यांच्या समाजातील अमृतादेवी आणि आशू, रत्नी व भागू या तीन मुलींचा. शतकभरापूर्वी, जोधपूरच्या राजाने महाल बांधण्यासाठी खेजरी झाडं तोडायचा आदेश दिला. तेव्हा या झाडांना मिठी घालून या चौघी घट्ट उभ्या राहिल्या. त्यात त्यांना स्वतःचे प्राण गमवावे लागले. पण त्या जागच्या हलल्या नाहीत. नंतरच्या काळात सुंदरलाल बहुगुणांच्या "चिपको आंदोलना'ची हीच प्रेरणा होती. अशा धीरोदात्त, शूर बिश्नोई महिलांचा वारसा पुनमचंद सांगतात. हरिणाचे एखादे पाडस आईविना अनाथ झाले असेल तर आपल्या बाळाबरोबर त्या पाडसाला स्तनपान करणाऱ्या महिला आजही तिथे आढळतात. मग, पुनमचंदांनी शिकारी सलमानच्या जिप्सीचा पाठलाग करून गाडीनंबर लिहून वनखात्याकडे सोपवला यात नवल ते काय ! बिश्नोई टायगर फोर्स, अ.भा.जीवरक्षा बिश्नोई सभा आणि बिश्नोई वन्यजीव पर्यावरण संस्थान या संघटनांनी आजवर 400 शिकारी पकडून दिले आहेत. जैवविविधता आणि प्राणीमात्राच्या रक्षणासाठी प्राणार्पणाची तयारी ठेवलेल्या पुनमचंदांनी पुढच्या काळातही असे प्रकार होऊ नयेत, यासाठी डोळ्यात तेल घालून राखण करण्याचा विडा उचलला आहे. खरे पाहिले तर ही केवळ बिश्नोईंचीच नव्हे तर आपल्या सगळ्यांचीच जबाबदारी आहे, नाही का?

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा