गुरुवार, १२ ऑक्टोबर, २०२३

मौनं सर्वार्थ साधनम्

 

मौनं सर्वार्थ साधनम् !



परवा रस्त्यानं जाताना कोपऱ्यातल्या चहाच्या टपरीवर पाच-सहा तरूण तावातावाने हातवारे करून भांडत असल्याचे दृश्य लांबून दिसले. मी जवळ पोचलो, तेव्हा ते सगळे मुके होते आणि खाणाखुणांच्या भाषेत मुक्यानेच बोलत होते, असे लक्षात आले. त्यांची ती मौनाची भाषा परस्परांना समजत होती. लांबून पाहणाऱ्याला मात्र त्यांच्यात संघर्ष चालल्यासारखं भासत होतं!

मौन बोलतं करतं तेव्हा ते अर्थपूर्ण असतंच, पण बऱ्याचदा अबोलणंही खूप काही सांगणारं असतं. खूपदा, अंतःकरण भरून आलेलं असतं, पण मुखावाटे एक शब्दही फुटत नाही. तरीही संवाद होत असतो. 'ये हृदयीचे ते हदयी' सगळं पोचत असते. असा मौनसंवाद असतो खूप दिवसांनी भेटलेल्या जिवलगांचा! आभाळ भरून आलेलं असतानाही ढग काही फुटत नाही, तशातला प्रकार!

मौन असं कुठं कुठं 'संवादत' असतं. नाटकातलं दोन वाक्यातलं मौन खूप काही बोलणारं असतं. कित्येकदा न बोलताही अपेक्षित परिणाम साधून जातं. कितीतरी दिवसांनंतर भेटल्यानंतरही फक्त 'हं ! हं !' इतकीच प्रतिक्रिया देणाऱ्या 'त्याला' ती म्हणते,''झालास पारवा? लागलास घुमायला!'' विजय तेंडुलकरांच्या 'मादी'मधला हा संवाद आहे. प्रेक्षकांना अधिकाधिक अर्थसन्मुख करणारा हा 'पॉज', हे क्षणकालाचं मौन अर्थगामी असतं. म्हणून अनेक उत्तम अभिनेते किंवा अभिनेत्री वाचाळ बडबडीपेक्षा मौनानं अधिक संवादतात!

योगसाधनेत मौन राहणं किंवा मौन पाळणं अत्याधिक महत्त्वाचं असतं. इगतपुरीच्या श्री. गोयंकागुरुजींच्या आश्रमात जितक्या दिवसांचा कोर्स असतो, तितके सगळे दिवस मौन पाळण्याचाच संकेत असतो. कोणताही साधक शक्यतो एकमेकांशी बोलून संवाद साधत नाही. आपल्या मनाची द्विधा अवस्था किंवा विचारांचा कल्लोळ हळूहळू शांत करीत माणसानं सर्वार्थानं निवांत व्हावं, यासाठीची ही मौनसाधना असते. मनाची मागणीच कमी होण्यासाठी ही तपस्या करावी लागते. आपले स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी मौनासारखे दुसरे साधन नाही.

रुसव्या-फुगव्यातलं मौन, तो अबोला अगदी कासावीस करून टाकतो दोघांना, पण काही काळ ओसरला की या मौनानंच त्यांना बोलकं केलेलं असतं. कवी हेमकिरण पत्कींच्या कवितेत हे मौनसंभाषण अल्पशब्दांतून प्रत्ययाला येतं. प्रेमामध्ये अशा अपघातानं उमटणाऱ्या मौनाला चांगला अर्थ असतो. तो अबोला, ते जाणते मौन अजिबात गौण नसतं, त्यातून नात्याला छान दिशा मिळते.

राजकीय मौन ही तर अर्थगर्भ खेळीच असते. कोणत्यावेळी बोलायचं आणि कोणत्यावेळी गप्प राहायचं हे मुरब्बी राजकारण्याला चांगलंच समजलेलं असतं. राजकारण्याच्या मौनाला अर्थाच्या अनेक छटा असतात, पण कोणता राजकारणी मौन पाळतो, त्याला फार महत्त्व आहे. माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांच्या संसदेत मौन राहण्याच्या कृतीवर झालेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं होतं ते मौनातूनच!

एखाद्या अनुपम सौंदर्यानं आपण स्तीमित होतो, आपले शब्द विरून जातात. कन्याकुमारीच्या तीन समुद्रांच्या संगमातला सूर्यास्त पाहताना किंवा कोणार्कपासून तीन किलोमीटरवर असलेल्या समुद्रातून सूर्यबिंब हळूहळू वर येताना सूर्योदयाचं दृश्य पाहताना कितीतरी वेळ मी मूकस्तंभ झालो होतो..!


रजनीश जोशी

०००

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा