बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६

पानगावचा अष्टकोनी तलाव !
वैराग-बार्शी रस्त्यावरचं पानगाव हे ऐतिहासिक महत्त्व असलेलं गाव आहे. सहा हजार लोकसंख्येच्या गावात अतिशय छान बांधलेला अष्टकोनी तलाव आहे. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याला पाणीटंचाईच्या झळा बसत असताना या तलावात सध्या पाणी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे पणतू या गावात अनेक महिने वास्तव्याला होते. इतकेच नव्हे तर शिवाजीराजांचे नातू छत्रपती राजारामांचे पुत्र दुसरे शिवाजी. त्यांची कन्या दर्याबाईचा विवाह पानगावच्या निंबाजी निंबाळकरांशी झाला होता. रामराजे हे दर्याबाईंचे बंधू. ते पाच वर्षे पानगावात मुक्कामाला होते. डॉ. सतीश कदम आणि अन्य प्रभृतींनी या इतिहासावर प्रकाश टाकला आहे. मुद्दा आहे तो तलावाचा. विविध लढायांच्या निमित्तानं इथं सैन्याचे तळ होते. त्यासाठी हा प्रचंड मोठा तलाव बांधला असावा, असं सांगितलं जातं. साधारण 1650 च्या सुमारासचा तो काळ. तेव्हा बांधलेला अष्टकोनी तलाव आजही सुस्थितीत आहे. त्यात पाणी आहे. उन्हाळ्याच्या तडाख्यात महिलांना पाण्यासाठी हा मोठाच आधार आहे.
या तलावातील पाणी घाण होणार नाही, याकडं लक्ष देण्याची गरज आहे. धुणी, भांडी घासणं, जनावरं धुणं किंवा तत्सम कारणांसाठी पाण्याचा वापर करताना घाण पाणी पुन्हा तलावातच मिसळतं. गावकऱ्यांनी त्याकडं लक्ष दिलं पाहिजे. तलावातून पाणी उपसून मग त्याचा आपापल्या सोयीनुसार वापर करायला हवा. तलावातच धुणी-भांडी करणं योग्य नव्हे.
पानगावप्रमाणेच सोलापूर जिल्ह्यातील बहुतेक सगळ्या गावांमध्ये पाण्याच्या सोयीसाठी पाणवठे आहेत. यंदाचा भीषण उन्हाळा लक्षात घेता, गावकऱ्यांनी गावोगावच्या या पाणवठ्यांचं श्रमदानातून पुनरूज्जीवन केलं पाहिजे. आपल्या गावाला पाणी हवं असेल तर जिल्हा परिषद किंवा जिल्हाधिकाऱ्यांनी येऊन पाणवठ्यातील गाळ काढला पाहिजे, बंधारा रूंद केला पाहिजे, विहिरीतला गाळ उपसला पाहिजे, अशी अपेक्षा करणं चुकीचं आहे. प्रशासन किंवा सरकारकडून टॅंकर पुरवण्याशिवाय दुसरी कृती होत नाही. आपलं गाव जलसमृद्ध करण्याची जबाबदारी आपलीच आहे.
पानगावात एकेकाळी प्रचंड संख्येचं सैन्य वस्तीला होतं. अष्टकोनी तलावाचा उपयोग त्यांना होत असे. हे पारंपरिक शहाणपण गावकऱ्यांनी पुन्हा जीवित केलं पाहिजे. करमाळा तालुक्‍यातील पाडळीसारख्या गावांनी स्वतःचं वेगळेपण सिद्ध केलं आहे. त्यामागं तिथल्या गावकऱ्यांची एकजूट कारणीभूत आहे.
पानगावातील तलावात साचलेला गाळ काढण्याचे कामही योग्य नियोजनानं केलं पाहिजे. अष्टकोनी तलावच नव्हे तर गावातील ऐतिहासिक हेमाडपंथी मंदिरं प्रेक्षणीय आहेत. नागनाथाच्या मंदिराचं बांधकाम हा स्थापत्यशास्त्राचा अनोखा नमूना ठरू शकतो. संपूर्ण दगडी बांधकामाची रेखीवता, त्यावरचं कोरीव काम पाहताना अजिंठा-वेरूळ लेण्यांतील कलात्मकतेचा प्रत्यय येतो. तथापि, मंदिराभोवती अतिक्रमणं नसावीत. आपल्या गावातील पुरातन वास्तूंचं महत्त्व गावकऱ्यांनी ओळखलं पाहिजे, त्यांच्या ते लक्षात येत नसेल तर संबंधितांनी जनजागरण केलं पाहिजे. पानगावातील तलाव, हेमाडपंथी मंदिर, निंबाळकरांचा वाडा या ठिकाणांचा जीर्णोद्धार केला तर ते उत्तम पर्यटन स्थळ होऊ शकतं. पानगावकरांची स्थिती कस्तुरीमृगासारखी झाली आहे. आपल्या गावचा कीर्तिसुगंध महाराष्ट्रभर पोचवण्याची मोठी संधी त्यांना आहे. विद्यमान सरकारनं गड-किल्ले रक्षणाची विशेष मोहिम उघडली आहे. शिवाजी महाराजांच्या वंशजांचं वास्तव्य असलेल्या पानगावातील ऐतिहासिक वास्तूंचं जतन करण्यासाठी मोठी निधीही मिळू शकतो. उदासीनता सोडून गावकऱ्यांनी कामाला लागलं पाहिजे, हे मात्र खरं. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा