बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१६



"सुंद्री' जेव्हा "सुंदर' होऊन जाते...!
सुंद्रीवादनाच्या साफल्याचा क्षण होता तो, जेव्हा नम्रता गायकवाड नावाची तरूणी आत्मविश्‍वासानं सगळ्या सभागृहाला डोलायला लावत होती....! ज्या जाणकारीनं नम्रताचं वादन सुरू होतं, ते पाहून "सुंद्री' खरोखर "सुंदर' झाली, असं म्हणावं लागेल. वाद्य आणि वादकामधील एकतानता अनुभवताना श्रोते भारावून गेले होते. आपल्या वादनानं नम्रता स्वतःच अंतर्बाह्य खुलली होती. उत्फ्फुल प्रतिसादानं ती फार मोहरून गेली नाही आणि वादनातील बहार अंशमात्रही कमी केली नाही. वादनातली आत्मतुष्टता तिच्या मुखावर विलसत होती. सुंद्रीसम्राट सिद्रामजी आणि पंडित चिदानंद जाधव संगीत महोत्सवात रविवारची सकाळ अशी सुरमयी झाली. नम्रतानं जी बंदिश सादर केली, तिचे बोल "निरागस' श्रोताही गुणगुणू शकेल, इतके स्वच्छ होते. तिच्या वादनानं सुंद्री जणू "बोलकी' झाली होती. सोलापुरातल्या ओसरणाऱ्या थंडीच्या किंचित गारव्यात हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या अँफी थिएटरमध्ये नम्रतानं आपल्या वादनानं विलक्षण ऊर्जा निर्माण केली होती. रसिकांमध्ये ती हळूहळू भिनत गेली आणि एका ऊर्जस्वी वादनाचा प्रत्यय आला. नम्रताचं रविवारचं सुंद्रीवादन आणखी पक्व होत जाईल... रसिकांची दाद तिला समृद्ध करत राहिल... आणि सुंद्री हे दुर्मीळ वाद्य नम्रतामुळं आणखी सुरेल होत जाईल..... भीमण्णांचे आजोबा सिद्रामप्पा यांनी शोधलेल्या या वाद्याचं सार्थकच झाल्याचा तो कृतार्थ क्षण होता...
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, स्वतःचं वादन झाल्यावर नम्रता प्रेक्षागृहात येऊन बसली. महोत्सवातील अन्य वादक, नृत्य कलाकारांच्या कलेचा आस्वाद घेत होती, हे चित्रही तिच्यातल्या नम्र जाणिवांचं सुखद दर्शन घडवणारं होतं. हातावर "टॅटू' काढून घेण्याची तरूणाईची फॅशन नम्रतानंही केली होती, पण तिच्या दोन्ही हातांवर "सुंद्री'चं चित्र होतं आणि हातात "सुंद्री' वाद्य !

सतार आणि तबल्याची जुगलबंदी !
केशवसुतांसारख्या कवीलाही सतारीच्या बोलांनी मोह घातला होता.... संतप्त मनस्थितीत घराबाहेर पडलेला कवी एका माडीवरून ऐकू येणारे सतारीचे "दिड दा दिड दा' असे स्वर ऐकून स्वतःलाच विसरून गेला.... अगदी तसा विलक्षण अनुभव सौम्यजित पॉल आणि रवी क्षीरसागर यांच्या वादनानं आला. कोलकत्याच्या त्या तरूण सतारवादकामध्ये त्याचं वादन जणू झिरपलं होतं....ते आपल्या बोटांच्या कौशल्यानं बाहेर काढून रसिकांच्या पुढ्यात ओतण्याचं काम तो करीत होता. त्यात त्याला अतिशय सुरेख साथसंगत रवी क्षीरसागर हा तबलापटू करीत होता. साथसंगत कशी असावी, त्याचा वस्तुपाठच त्यादिवशी रवीनं दाखवला. मुख्य वादन सतारीचं आहे याचं भान कुठंही सुटू न देता, आपल्या तबल्याच्या संगतीनं सतार अधिक सुरेल करण्याचं काम रवीनं केलं. सतार आणि तबल्याचा समसमा संयोग असं त्याला म्हणता येईल. अगदी रूढ प्रतिमांचा वापर करायचा तर फुलांत सुगंध दडलेला असावा किंवा दुधात साखर मिसळून अवीट माधुर्य प्राप्त व्हावं, तसं या वादनात तबला आणि सतार एकमेकांत मिसळून गेले होते. रवीचं तबला संगतीचं कौशल्य इतकं अद्‌भूत होतं, की सतारवादक सौम्यजित त्यानं हरखून जात होता. आपल्या बोटातून "एक से बढकर एक' जादूई चीजा तो बाहेर काढत होता. रवीच्या साथसंगतीनं कित्येकदा सौम्यजित चकित होत होता; हातात तबला असूनही त्यात किती मार्दव असावं? सतारवादकाच्या नावात "सौम्य'ता पण जित मात्र रवीची झाली, असंच वाटत होतं. अर्थात सौम्यजितही कमी नव्हता. सौम्यजितचा प्रखर आत्मविश्‍वास, वादनातील नैपुण्य आणि सहजता यानं रसिक वारंवार आनंदून टाळ्या पिटत होते. शतमुखानं एकाचवेळी "व्वा व्वा'चा गजर करीत होते. सौम्यजितच्या वादनानं रसिकांच्या अंतःकरणातील सतारच छेडली होती जणू. ही सतार रसिकमनात दीर्घकाळ झंकारत राहिल...जोडीला रवीच्या तबल्याचा मधूर ठेकाही नादावत राहिल....! सौम्यजित आणि रवी... अप्रतिम अनुभवाबद्दल रसिक तुमचे ऋणी राहतील...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा