शुक्रवार, १ जानेवारी, २०१६

माचणूर शिवारात राबतोय कथालेखक !
------
काळ्या मातीत राबून लेखनाचं हिरवं स्वप्न डोळ्यात घेऊन वावरणारा सिद्धेश्‍वर पवार नावाचा कथालेखक शेतमजूर म्हणून जगण्याशी दोन हात करीत आहे. सोलापूर जिल्ह्यातील माचणूर भागात कोणाच्याही शेतात, मिळेल ते काम करून मजुरी करणाऱ्या सिद्धेश्‍वरांचे तीन विनोदी कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत.  लेखक सिद्धेश्‍वराची ही आगळी कथा....!
--------
रजनीश जोशी
-------
घरातली कामं करता करता ओव्या आणि कवनं स्फुरणाऱ्या बहिणाबाई चौधरी किंवा रानात कष्टाची कामं करता करता कवितांचं मोहजाल निर्माण करणारे ना. धों. महानोर हे मराठी साहित्यसृष्टीचं वैभव आहे. सोलापूर जिल्ह्यातल्या माचणूर परिसरात सिद्धेश्‍वर पवार हेही असंच व्यक्तिमत्व. ग्रामीण विनोदी कथालेखन करणारे सिद्धेश्‍वर पवार मजूर म्हणून दुसऱ्याच्या शेतात काम करतात. पिकाला दिलेल्या पाण्याचे दंड फोडून, पुन्हा भरता भरता कित्येक कथांची बीजं त्यांच्या मनात रूजवतात आणि त्यातून निर्माण होतात अनेक कथा. अशा विनोदी कथांचे तीन संग्रह कोल्हापूरच्या इंद्रनील प्रकाशनाने प्रसिद्ध केले आहेत.
सिध्देश्‍वर पवारांना दोन भाऊ. घरची फक्‍त दोन एकर जमीन. शिक्षण दहावीपर्यंत झालेलं. वडील शेतात राबतात, आई शेळीपालन करते. स्वतः सिद्धेश्‍वर पवारही दुसऱ्यांची गुरं राखणं, शेतात मिळेल ते काम करून चरितार्थ चालवतात. पण या सगळ्यात त्यांना चित्रपटाची आवड गप्प बसू देत नाही. संधी मिळेल तेव्हा ते मराठी चित्रपट पाहतात. गावची जत्रा, किंवा काही कामानिमित्त सोलापूर-कोल्हापूर दौरा झाला की ते चित्रपट पहायला जातातच.
विनोदी चित्रपट हा त्यांचा आवडीचा प्रांत. मराठी चित्रपटातील ग्रामीण पार्श्‍वभूमीशी त्यांची नाळ जुळलेली. आपल्याच मातीत, आपल्या गावात-परिसरात घडणाऱ्या घटना-प्रसंगांचं चित्रपटातील दृश्‍यांशी असलेलं साधर्म्य सिद्धेश्‍वरांना भूरळ घालत होतं. त्यांना वाटलं, "अरे, हे तर सगळं मीही लिहू शकतो.' मग चित्रपट लेखनाचा ध्यास त्यांनी घेतला. पटकथा लेखनाचं कोणतंही रितसर शिक्षण त्यांनी घेतलेलं नाही. चित्रपटातील प्रसंग कसे घडतात, त्यातील संवाद कसे असतात हे चित्रपट पाहून पाहून त्यांनी आत्मसात केलं आणि 2005 मध्ये चित्रपट लेखनासाठी बैठक मारली. चित्रपट करायचा म्हणजे आर्थिक अडचणी खूप. त्यामुळं थोडंफार लेखन करून त्यांनी हे काम थांबवलं.
आता लिहिण्याची ऊर्मी गप्प बसू देत नव्हती. शेतात राबताना मनात कथेचाच विचार सुरू होता. मग लहानपणापासून गावात, पंचक्रोशीत घडलेले विनोदी प्रसंग त्यांना आठवू लागले आणि त्यातून त्यांनी कथा लिहायला सुरूवात केली. कथा हवेतून निर्माण होत नाही, ती आपल्या सभोवतालीच घडत असते. सिद्धेश्‍वरांची शोधक नजर कथेची बीजं मनात साठवू लागली. त्यातून "गावगुंड' हा त्यांचा कथासंग्रह प्रकाशित झाला. त्याच्या नावातूनच त्यातील कथांचा अंदाज बांधता येतो. या कथासंग्रहानं सिद्धेश्‍वर पवारांना हुरूप आला. मग झपाट्यानं लेखन सुरू झालं. अल्पावधीतच "घुळी' हा दुसरा कथासंग्रह प्रकाशित झाला. या कथासंग्रहाला ग्रामीण भागातून चांगला वाचक वर्ग लाभला. कोल्हापूरच्या इंद्रनील प्रकाशनानं मग सिद्धेश्‍वरांच्या लेखनाचं दायित्व स्वीकारलं, असंच म्हणावं लागेल. कारण त्यांचा तिसरा कथासंग्रह "जुग' प्रकाशनाच्या मार्गावर आहे. लेखनावर निष्ठा ठेवून सातत्यानं लिहित राहणं हे सिद्धेश्‍वरांचं वैशिष्ट्य.
स्वतःच्या जगण्यासाठी राबणं आणि लोकांनी हसत जगावं यासाठी विनोदी कथालेखन असा जीवनक्रम सिद्धेश्‍वर पवार व्यतीत करीत आहेत. पूर्णवेळ लेखनावर उपजीविका होत नाही, शेताची मशागत करताना मनाची मशागत करणं क्रमप्राप्त ठरतं. अशा अनंत अडचणींवर मात करीत सिद्धेश्‍वरांची लेखणी सुरू आहे. शेळीपालन करणारी आई आणि काबाडकष्ट करणाऱ्या वडिलांना आपल्या मुलातील लेखन गुणांचं कौतूक जरूर आहे, पण उत्तम राहणीमानासाठी लेखन उपयोगी पडेल, असं त्यांना वाटत नाही आणि ते स्वाभाविकही आहे.
सृजनाचे पंख मिळूनही मातीत खपण्याचं भागधेय घेऊन लढणारा सिद्धेश्‍वर पवार नावाचा उद्याचा दमदार लेखक जीवनाकडून फार मोठ्या अपेक्षाही ठेवत नाही. "आपलं स्वतःचं एक घर असावं. त्यात लिहिण्यासाठी छान जागा असावी, उपजीविकेची फार चिंता नसावी,' इतकी साधी त्यांची इच्छा आहे. उत्तम दर्जाचा विनोदी चित्रपट लिहून लोकांना हसवण्याचं त्यांचं स्वप्न आहे. भलेही, त्यांच्या कथांमध्ये सुधारणेला वाव असेल, पण आपल्या कथांमधील प्रसंग त्यांनी ज्या पद्धतीनं खुलवले आहेत, त्याचा विचार केला तर या लेखनात कस आहे. सोलापुरी मातीचा गंध त्यात मिसळला आहे, असंच लक्षात येईल. हे अस्सल लेखन अधिक दर्जेदार करायचं असेल, फुलवायचं असेल तर समाजानंही त्यांना मदत करणं गरजेचं आहे. अन्यथा उद्याचा एक कथालेखक शेतात राबून अखंड कष्टत राहिल आणि लेखणीपासून दुरावेल. माऊली हेगडेसारखा संवेदनशील तरूण सिद्धेश्‍वराची ही कहाणी ऐकून हेलावतो. त्याला मदत करायची इच्छा प्रदर्शित करतो; ते तर चांगलं आहे. पण या कथालेखनाची दखल साहित्य परिषदेसारख्या संस्थांनी घ्यायला हवी. विचारवंत आणि बुद्धिवंतांनी सिद्धेश्‍वरला सर्वार्थानं समृद्ध करण्यासाठी मदत करायला हवी, इतकेच. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा